Investment Plans For Children: मुलांचे भविष्य उज्ज्वल करायचेय? आतापासूनच करा सुरुवात; ‘अशी’ करता येईल गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 03:38 PM2022-08-04T15:38:51+5:302022-08-04T15:53:19+5:30

Investment Plans For Children: अगदी किफायतशीर दराचे पण उच्च परतावा देणाऱ्या प्लानमध्ये तुम्ही आतापासूनच गुंतवणूक करू शकता. जाणून घ्या, सविस्तर डिटेल्स...

प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याची काळजी असते. आपले आयुष्य कसेही गेले असले, तरी आपल्या पाल्याचे भविष्य हे चांगेलच असावे, यासाठी पालक दिवस-रात्र झटत असतात. मुलांचे भविष्य अधिक चांगले व्हावे, यासाठी ते लहान असल्यापासूनच गुंतवणूक करून मुले वयात आली की, त्याचा परतावा पालक घेऊ शकतात. मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक पाठबळ उभे करण्यासाठी पालकांनी गुंतवणूक करावे असे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. (Investment Plans For Children)

देशभरातील विविध संस्थाच्या अनेकविध योजना आताच्या घडीला उपलब्ध असून, अगदी किफायतशीर परंतु उच्च परतावा देणारे प्लान तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच मिळकतीतील अगदी छोटा हिस्सा आतापासूनच गुंतवणूक भविष्यात उत्तम परतावा मिळण्यासाठी आतापासूनच सुरुवात करू शकता. तुम्ही बाजारातील जोखीम लक्षात घेताही गुंतवणूक करू शकता. जर, तुम्ही मुलांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही पर्यायांवर विचार करता येईल.

दीर्घकालीन आणि जोखीम मुक्त गुंतवणुकीसाठी तुम्हाला मुदत ठेवीचा (Fixed Depoist) पर्याय आहे. मुदत ठेवीत तुम्ही सात दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्ही मुलांच्या भविष्यासाठी १० वर्षांसाठी मुदत ठेवीत गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला आकर्षक व्याज मिळू शकते. प्रत्येक बँकांचे व्याज वेगवेगळे असते. त्यामुळे सुरक्षित पण चांगला परतावा देणाऱ्या बँकांमध्ये तुम्ही ठेवी ठेवू शकता.

तुम्ही बाजारातील जोखीम स्वीकारून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये SIP द्वारे गुंतवणूक करणे एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. यामध्ये तुम्ही किमान १०० रुपयांपासूनही गुंतवणूक करू शकता. याद्वारे चांगली बचत होऊ शकते. आताच्या घडीला देशात अनेकविध प्रकारचे म्युचुअल फंडाचे प्लान उपलब्ध आहेत.

याशिवाय तुमच्याकडे PPF चाही पर्याय उपलब्ध आहे. दीर्घ कालावधीसाठी तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला पर्याय असणार आहे. पीपीएफमध्ये आताच्या घडीला ७.१ टक्के व्याज दर मिळू शकतो. यामध्ये तुम्ही १५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या गुंतवणुकीवर तुम्हाला आयकर कायद्यातील ८० सी नुसार कर सवलत मिळते.

तुम्हाला तुमच्या कन्येच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही मुलीसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला ७.६ टक्के व्याज दराने परतावा मिळू शकतो. या योजनेत तुम्ही नवजात बालिकेपासून ते १० वर्षापर्यंतच्या मुलीच्या नावाने गुंतवणूक करू शकता. यामध्ये दरवर्षी २५० रुपये दीड लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक करू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेनुसार, मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या खात्यातून अंशत: रक्कम काढू शकता. तर, मुलीने वयाची २१ वर्ष पूर्ण केल्यानंतर ती खात्यातील सर्व रक्कम काढू शकते. या गुंतवणुकीवर तुम्हाला आयकर कायद्यातील ८० सी नुसार कर सवलत मिळू शकते. ही योजना देशभरात यशस्वी ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

या योजनांसह पोस्ट ऑफिस (Post Office), एलआयसी (LIC) यांच्याही अनेक योजना मुलांसाठी उपयुक्त आहेत. ज्यात कमी पैशांच्या गुंतवणुकीत दीर्घकालीन योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास अपेक्षित परतावा नक्कीच मिळू शकतो.

मुलांसाठी गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूक पर्याय शोधताना महागाई दरही लक्षात घ्यावा. तरच, तुम्हाला गुंतवणुकीबाबत योग्य निर्णय घेता येईल. गुंतवणुकीबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागारांशी चर्चा करून निर्णय घेऊ शकता, असे सांगितले जाते.