Credit Card Charges: क्रेडिट कार्डावर लागतात हे ५ चार्ज, कोणतीही बँक किंवा एजंट तुम्हाला याबद्दल सांगणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 09:57 AM2022-05-30T09:57:50+5:302022-05-30T10:07:01+5:30

Credit Card Charges: जर तुम्ही क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल आणि कोणीतरी तुम्हाला त्याचे फायदे सांगितले आहेत आणि ते विनामूल्य उपलब्ध असल्याचे सांगितले आहे, तर सावधगिरी बाळगा.

Credit Card Charges: जर कोणी तुम्हाला क्रेडीट कार्ड मोफत मिळते आणि त्यावर कोणतेही शुल्क (Credit Card Charges) आकारले जात नाही असे सांगितले तर तो चुकीचे सांगत आहे असे समजा. तुम्हाला बरेच लोक सापडतील जे तुम्हाला क्रेडिट कार्डवरील सर्व सूट आणि रिवॉर्ड पॉइंट्सबद्दल (Credit Card Reward Points) सांगतात. परंतु जर तुम्ही लक्ष दिले नाही तर हे बेनिफिट्सवालं क्रेडिट कार्ड तुमच्या नुकसानीचं कारणही ठरू शकतं हे कोणी सांगणार नाही.

स्वस्त वस्तू ऑफर करणारे क्रेडिट कार्ड तुम्हाला त्यावरील शुल्कांबद्दल माहिती नसल्यास ते तुम्हाला खूप महागात पडू शकते. प्रत्येक कार्डवर काही शुल्क आकारले जाते, काहीवेळा ते ग्राहकांच्या निष्काळजीपणामुळे आकारले जातात. अशा काही शुल्कांचा उल्लेखही बँक किंवा एजंटही सहसा करत नाहीत. अशाच काही महत्त्वाच्या शुल्कांबद्दल जाणून घेऊया.

अॅन्युअल चार्ज हे असे शुल्क आहे जे निरनिराळ्या बँका निरनिराळ्या प्रकारे आकारते. अशा अनेक बँका आहेत ज्या हे शुल्क आकारत नाहीत, तर काही अशा आहेत ज्या हे शुल्क आकारतात, परंतु जर तुम्ही एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ते हे शुल्क परत करतात.

त्यामुळे जर तुम्ही क्रेडिट कार्ड घेतले तर आधी बँक त्यावर वार्षिक शुल्क आकारत नाही ना हे तपासा आणि जर असेल तर ठराविक मर्यादेपर्यंत खर्च केल्यावर पैसे परत करावेत अशी त्याची पॉलिसी असली पाहिेजे. दुसरीकडे, जर बँक कोणत्याही परिस्थितीत वार्षिक शुल्क आकारत असेल, तर जेव्हा तुम्हाला खूप गरज असेल तेव्हाच ते क्रेडिट कार्ड घ्या.

देय रकमेवर व्याज तर प्रत्येक बँका आकारतात. परंतु जे ग्राहक वेळेत रक्कम भरत नाहीत त्यांच्याकडून हे शुल्क आकारले जाते. जर तुम्ही ड्यु डेट पूर्वी पैसे भरले तर ठीक, अन्यथा बँका तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात व्याज आकारतात. मिनिमम ड्यू देखील तुम्हाला मोठ्या व्याजापासून वाचवू शकणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. यामुळेच ड्यू डेटपर्यंत तुमच्या सर्व क्रेडिट कार्डच्या रकमेचा भरणा करा. अन्यथा तुम्हाला ४० टक्क्यांपर्यंत व्याज लागू शकतं.

अनेक कार्ड कंपन्या तुमच्याकडून क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून कॅश काढल्यावर चार्ज वसूल करतात. क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वी हे समजून घ्या की क्रेडिट कार्डवर खर्च होणारा प्रत्येक रुपया हे एक प्रकारचे कर्ज आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही क्रेडिट कार्डमधून पैसे काढले तर लक्षात ठेवा की पैसे काढण्याच्या दिवसापासून शुल्क आकारण्यास सुरुवात केली जाते.

म्हणजेच, जर तुम्ही कार्डने खरेदी केली तर तुम्हाला देय तारखेपर्यंत कोणतेही व्याज न भरता पैसे द्यावे लागतील. परंतु जर तुम्ही पैसे काढले तर पैसे काढल्याच्या दिवसापासून ते पैसे भरल्याच्या दिवसापर्यंत व्याज द्यावे लागेल. अशा परिस्थितीत लक्षात ठेवा की जोपर्यंत अखेरचा पर्याय ठरत नाही, तोवर क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून पैसे काढू नका. अन्यथा तुमचं मोठं नुकसान होईल.

जवळपास सर्व बँकांच्या क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून इंधन भरण्यावर सरचार्ज आकारतात. क्रेडीट कार्ड देताना बहुतांश बँका सरचार्ज परत केला जाईल असे स्पष्ट करतात, परंतु जर बँकेने तशी माहिती दिली नसेल, तर ही बाब आधीच स्पष्ट करून घ्या. बहुतांश बँका एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सरचार्ज परत करतात.

उदाहरणार्थ, तुम्हाला किमान ५०० आणि कमाल ५००० रुपयांच्या व्यवहारांवर सरचार्ज परतावा मिळू शकतो. तसेच, तुम्हाला एका महिन्यात १०० किंवा २०० चा परतावा किंवा बँकेकडून सरचार्ज म्हणून इतर कोणतीही निश्चित रक्कम मिळू शकते. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी या शुल्काची संपूर्ण माहिती घ्या.

अनेक बंका ग्राहकांकडून ओव्हरसिज ट्रान्झॅक्शन चार्जही घेतात. क्रेडिट कार्ड देताना, अनेक बँका त्यांच्या फीचर्समध्ये क्रेडिट कार्डाचा वापर हा परदेशात देखील केला जाऊ शकतो असं सांगतात. तथापि, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की परदेशात क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी देखील अनेकदा मोठे शुल्क आकारले जाते, जे बँक उघड करत नाही.

जर तुम्हीही परदेशात जाण्याचा विचार करत असाल आणि तुमच्या क्रेडिट कार्डने तिथे काही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमच्या बँकेशी बोलून किती शुल्क आकारलं जातं अथवा नाही याची खात्री करून घ्या.