४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 09:19 IST2025-11-22T08:55:51+5:302025-11-22T09:19:59+5:30

Petrol Diesel: अनेकदा लोकांना असं वाटतं की, राउंड फिगरमध्ये इंधन भरल्यास फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. उदाहरणार्थ, ५००, १०० रुपयांचे पेट्रोल भरल्यानं फसवणूक होऊ शकते असं अनेकांना वाटतं.

Petrol Diesel: अनेकदा लोकांना असं वाटतं की, राउंड फिगरमध्ये (Round Figures) इंधन भरल्यास फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. उदाहरणार्थ, ५००, १०० रुपयांचे पेट्रोल भरल्यानं फसवणूक होऊ शकते असं अनेकांना वाटतं. पण सत्य हे आहे की, पेट्रोल पंपावर होणाऱ्या घोटाळ्याचा या आकडेवारीशी कोणताही थेट संबंध नसतो.

फसवणूक करणाऱ्या पंपांवर मशीनपासून ते नोजलपर्यंत अशा प्रकारे तांत्रिक फेरफार केले जातात की, ग्राहकाला कळतही नाही आणि त्याचे पैसे पूर्ण कापले गेल्यावरही इंधन कमी टाकलं जातं. जर तुम्हीही पेट्रोल-डिझेल भरताना ४९०, ५१० किंवा ५२० सारख्या विशिष्ट आकडेवारीत इंधन भरणे सुरक्षित मानत असाल, तर हा तुमचा केवळ गैरसमज आहे.

पेट्रोल पंपावर कोणत्या लहान चुकांमुळे आपलं सर्वात जास्त नुकसान होतं? आणि त्या फसवणुकीपासून वाचण्याचा खरा मार्ग काय आहे? खरं तर, पेट्रोल-डिझेल भरताना तुम्हाला फक्त दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागतं. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानेच बहुतांश ग्राहकांची फसवणूक होते.

घनता म्हणजेच डेन्सिटी नक्की तपासा: पेट्रोल किंवा डिझेलची गुणवत्ता बरोबर आहे की त्यात भेसळ आहे, हे घनतेवरून कळतं. प्रत्येक पेट्रोल पंपावर डेन्सिटी मीटर असतं आणि मशीनवर त्याचं रीडिंग देखील दिसतं.

पेट्रोलची घनता ७२० ते ७७५ दरम्यान असते आणि डिझेलची घनता ८२० ते ८६० च्या दरम्यान असते. जर घनता या मर्यादेच्या बाहेर दिसत असेल, तर इंधनाची गुणवत्ता ठीक नाही किंवा त्यात भेसळ केली गेली आहे, असं समजावं. अशा वेळी इंधन न भरणंच चांगलं. अनेकदा ग्राहक घाईत असतात आणि ही घनता तपासण्यास विसरतात आणि ही चूक घोटाळ्याचं सर्वात मोठं कारण बनते.

मशीनचं रीडिंग तपासा: बहुतांश लोक फक्त 'शून्य' (Zero) बघून घेतात, पण खरा खेळ त्यानंतर सुरू होतो. शून्य नंतर मीटरवरील पुढील संख्या ५ पेक्षा कमी असावी, जसं की २, ३ किंवा ४. जर मीटर शून्यावरून थेट १०, १२ किंवा १५ वर उडी मारत असेल, तर हे स्पष्ट संकेत आहे की मशीनमध्ये फेरफार केलेला आहे. अशा मशीनमधून इंधन नेहमी कमी दिलं जाते.

तुम्ही ११० चे इंधन भरा, २१० चे भरा किंवा ३१० चं भरा, या आकडेवारीनं कोणताही फरक पडत नाही. जर मशीनमध्ये फेरफार असेल, तर कोणत्याही रकमेवर तुम्हाला कमी इंधन मिळेल.