Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त

By जयदीप दाभोळकर | Updated: June 17, 2025 09:16 IST2025-06-17T09:07:18+5:302025-06-17T09:16:28+5:30

Israel-Iran War: इस्रायल आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. गेल्या वर्षीच दोन्ही देशांमध्ये तुरळक लष्करी कारवाया झाल्या होत्या. पण २०२५ मध्ये दोन्ही देश उघडपणे एकमेकांसमोर आले आणि त्यांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रं डागण्यास सुरुवात केली.

Iran Israel war: इस्रायल आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. गेल्या वर्षीच दोन्ही देशांमध्ये तुरळक लष्करी कारवाया झाल्या होत्या. पण २०२५ मध्ये दोन्ही देश उघडपणे एकमेकांसमोर आले आणि त्यांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रं डागण्यास सुरुवात केली. इस्रायलनं इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केला, त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रं डागली.

आता नजीकच्या भविष्यात ही परिस्थिती सुधारताना दिसत नाही. अशा तऱ्हेनं लष्करीदृष्ट्या कोणता देश अधिक शक्तिशाली आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोणता देश संरक्षणावर जास्त खर्च करतो? स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सिपरी) आणि इतर जागतिक आर्थिक संस्थांच्या आकडेवारीनुसार दोन्ही देशांच्या रणनीती आणि संसाधनांमध्ये मोठी तफावत आहे.

इस्रायलनं २०२४ मध्ये संरक्षणावर सुमारे ४६.५ अब्ज डॉलर्स खर्च केले, जे त्याच्या एकूण जीडीपीच्या सुमारे ८.८ टक्के आहे. युक्रेननंतर हा आकडा जगात सर्वाधिक आहे. इस्रायलची अर्थव्यवस्था भक्कम असली तरी गाझा आणि लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे त्याचा लष्करी खर्च नव्या उंचीवर पोहोचला आहे.

आधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली, सायबर सुरक्षा आणि हवाई संरक्षण जसे की आयर्न डोममध्ये मोठी गुंतवणूक, तसंच अमेरिकेकडून वार्षिक ३.८ अब्ज डॉलर्सची लष्करी मदत यामुळे इस्रायलची लष्करी ताकद मजबूत होत आहे. अमेरिकेची ही मदत त्याच्या एकूण संरक्षण खर्चाच्या सुमारे ८ ते १० टक्के असल्यानं देशांतर्गत आर्थिक बोजा किंचित कमी होतो.

दुसरीकडे, इराणनं २०२४ मध्ये संरक्षणावर सुमारे ७.९ अब्ज डॉलर्स खर्च केले, जे जीडीपीच्या केवळ २.२ टक्के आहे. पण याचा अर्थ इराणची लष्करी ताकद कमकुवत आहे असा होत नाही. आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि आर्थिक संकटांच्या काळातही इराण आपल्या रणनीतीचा एक भाग म्हणून असमान युद्धावर अवलंबून आहे. येमेनमधील हौथी बंडखोरांपासून ते इराक आणि सीरियातील मिलिशियापर्यंत इराण या गटांच्या माध्यमातून आपली पकड कायम ठेवतो. इराणच्या अर्थसंकल्पात क्षेपणास्त्रं, ड्रोन आणि अणुकार्यक्रम यांसारख्या तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे, जे स्वस्त मानले जातात परंतु खर्चाच्या दृष्टीने प्रभावी मानले जातात.

संरक्षण खर्च आणि जीडीपी गुणोत्तराचा विचार केला तर इस्रायलचा ८.८% हा जागतिक सरासरी २.२% पेक्षा कित्येक पटीने जास्त आहे, तर इराण या जागतिक सरासरीच्या आसपास आहे. एकूण खर्चाच्या बाबतीत इस्रायल इराणपेक्षा सुमारे ६ पट अधिक खर्च करत असला तरी इराणचा देशांतर्गत उत्पादन खर्च आणि खरेदी करण्याची शक्ती याचा समतोल साधण्यास काही प्रमाणात मदत करते.

इस्रायलची रणनीती प्रामुख्यानं राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रतिबंधक उपयांवर केंद्रित आहे, तर इराण प्रादेशिक प्रभाव आणि राजकीय नियंत्रणाच्या दिशेनं वाटचाल करतो, असे तज्ज्ञांचं मत आहे. इस्रायलची सत्ता टिकवून ठेवण्यात अमेरिकेची मदत महत्त्वाची भूमिका बजावते, तर इराणचे आर्थिक अडथळे आणि निर्बंध यामुळे तो उघडपणे लष्करी खर्च वाढवू शकत नाही.