इराणची ‘जीवनरेखा’! या ठिकाणावर हल्ला झाला, तर तिसऱ्या महायुद्धाचा धोका; तिथे नेमकं काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 15:38 IST2026-03-09T15:30:50+5:302026-03-09T15:38:23+5:30

अमेरिका आणि इस्रायलने अजूनपर्यंत या ठिकाणाला हात का लावला नाही?

Iran-America-Israel: अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर सातत्याने हवाई हल्ले सुरू आहेत. मात्र, यातदरम्यान एक महत्त्वाचे ठिकाण अजूनही सुरक्षित आहे. ते म्हणजे 'खार्ग आयलंड'. हे छोटे बेट इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य केंद्र असून, देशाच्या अर्थव्यवस्थेची जीवनरेखा मानली जाते. तज्ज्ञांच्या मते, या बेटावर हल्ला झाल्यास इराणची अर्थव्यवस्था कोलमडू शकते आणि जागतिक तेलबाजारात मोठी उलथापालथ होऊ शकते.

खार्ग आयलंड हे इराणच्या किनाऱ्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर, उत्तरी पर्शियन गल्फमध्ये स्थित छोटे बेट आहे. १९६० च्या दशकात अमेरिकन तेल कंपनी अमोकोने येथे तेल निर्यात सुविधांचा विकास केला होता. आज हे बेट इराणचे मुख्य तेल निर्यात टर्मिनल म्हणून ओळखले जाते. येथे दररोज सुमारे ७० लाख बॅरल तेल लोड करून जगभर पाठवले जाते. इराणच्या परदेशी तेल निर्यातीपैकी जवळपास ९० टक्के निर्यात याच ठिकाणावरून होते.

अमेरिका आणि इस्त्रायलने इराणच्या अणू प्रकल्पांवर, तेल सुविधांवर आणि लष्करी तळांवर हवाई हल्ले केले. मात्र खार्ग आयलंडला अद्याप लक्ष्य केलेले नाही. तज्ज्ञांच्या मते, या बेटावर हल्ला झाल्यास इराणची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईलच, शिवाय जागतिक तेल बाजारातही मोठे संकट निर्माण होईल. तेलाच्या किमती प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. तसेच चीन हा इराणच्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक असल्याने त्यालाही मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

खार्ग बेटावर दक्षिण भागात मोठे तेल साठवण टँक उभारलेले आहेत. समुद्रात लांब जेट्टी असून येथे मोठे सुपर टँकर तेल भरतात. समुद्राखालील पाइपलाइनद्वारे हे टर्मिनल इराणच्या मुख्य तेल क्षेत्रांशी जोडलेले आहे. हे बेट आकाराने लहान आणि मोकळे असल्यामुळे हवाई हल्ल्यात सहज नष्ट होऊ शकते. मात्र अशा हल्ल्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, जर खार्ग आयलंडवर हल्ला झाला तर इराण होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. या मार्गाने जगातील जवळपास २० टक्के तेल वाहतूक होते.

खार्ग आयलंडवर हल्ला झाल्यास इराण त्याला आपल्या अस्तित्वाचा प्रश्न मानू शकतो. त्यानंतर इराण केवळ होर्मुझ सामुद्रधुनी बंद करणार नाही, तर खाडीतील तेल टँकरांवरही हल्ले करू शकतो. अशा परिस्थितीत इराणचे सहयोगी देशही युद्धात उतरू शकतात. त्यामुळे संघर्ष जागतिक स्तरावर वाढून तिसऱ्या महायुद्धाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे अनेक विश्लेषकांचे मत आहे.

सध्या खार्ग आयलंडवर तेल लोडिंग आणि निर्यात नेहमीप्रमाणे सुरू आहे. फायनान्शियल टाइम्सच्या अहवालानुसार, युद्धाच्या तणावातही येथे तेल वाहतूक थांबलेली नाही. मात्र संघर्ष अधिक तीव्र झाल्यास भविष्यात या द्वीपावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या मात्र अमेरिका आणि इस्त्रायल या ठिकाणाला “रेड लाइन” मानून सावध भूमिका घेत आहेत.