भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 10:49 IST2025-07-10T10:25:42+5:302025-07-10T10:49:57+5:30
Amrik Sukhdev Dhaba : कोणत्याही टीव्ही जाहिराती, सोशल मीडिया प्रमोशन किंवा सेलिब्रिटींच्या जाहिरातीशिवाय, हा ढाबा दरमहा सुमारे 8 कोटी कमावतो.

हरियाणातील मुरथल येथे असलेला 'अमरिक सुखदेव ढाबा' आज फक्त एक साधा ढाबा राहिलेला नाही, तर तो एक मोठा ब्रँड बनला आहे. एकेकाळी फक्त ट्रक ड्रायव्हर्ससाठी असलेले हे ठिकाण, आज दिल्ली-एनसीआरमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या हजारो लोकांची पहिली पसंती आहे.
कोणत्याही टीव्ही जाहिराती, सोशल मीडिया प्रमोशन किंवा सेलिब्रिटींच्या जाहिरातीशिवाय, हा ढाबा दरमहा सुमारे ८ कोटी रुपये कमावतो. इतकेच नाही, तर तो भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा म्हणूनही ओळखला जातो.
सीए सार्थक आहुजा यांनी त्यांच्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये अमरिक सुखदेव ढाबाच्या कमाईचे गणित मांडले आहे. त्यांनी सांगितले की, या ढाब्यावर एका वेळी सुमारे ६०० लोक बसू शकतात. विशेष म्हणजे, प्रत्येक टेबलावर साधारण ४५ मिनिटांत नवीन ग्राहक येतात. या हिशोबानुसार, एका दिवसात सुमारे ९,००० ग्राहक इथे जेवतात.
जर प्रत्येक ग्राहकाने सरासरी ३०० रुपये खर्च केले, तर ढाब्याचे दररोजचे उत्पन्न सुमारे २७ लाख रुपये होते. याचा अर्थ एका महिन्यातील उलाढाल सुमारे ८ कोटी रुपये आहे आणि दरवर्षी हा आकडा १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पोहोचतो. हे आकडे पाहून अनेक जणांना धक्का बसतो, पण हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.
अमरिक सुखदेव ढाबाची सुरुवात १९५६ मध्ये सरदार प्रकाश सिंग यांनी केली होती. त्यावेळी तो फक्त ट्रक चालकांसाठी होता. पण, जशी जशी उत्तम गुणवत्ता, स्वच्छता आणि वेळेवर सेवा मिळत गेली, तसतसे त्याचे नाव वाढत गेले. आज त्यांचे मुलगे अमरिक आणि सुखदेव हा यशस्वी व्यवसाय सांभाळत आहेत.
ढाब्याची स्वतःची जमीन असल्यामुळे त्यांना भाड्याचा खर्च नाही. इथे ५०० हून अधिक कर्मचारी काम करतात. कर्मचाऱ्यांचा खर्च एकूण उत्पन्नाच्या ५-६% इतका कमी आहे, हेही त्यांच्या फायद्याचे एक कारण आहे.
एका अहवालानुसार, अमरिक सुखदेव ढाब्याला जगातील 'टॉप लेजेंडरी रेस्टॉरंट्स'च्या यादीतही स्थान मिळाले आहे. भारतातील हा एकमेव ढाबा आहे, ज्याला कोणत्याही आलिशान ब्रँडिंगशिवाय अशी जागतिक ओळख मिळाली आहे.
या ढाब्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचे अप्रतिम जेवण, खास करून मसालेदार बटाट्याचे पराठे. याशिवाय, तिथे मिळणारी स्वच्छता, व्यवस्थित सजवलेली बसण्याची जागा आणि वेळेवर मिळणारी सेवा हे सर्व ग्राहकांना आकर्षित करते. तुम्ही कुटुंबासोबत असा किंवा मित्रांसोबत, हे ठिकाण सर्वांना आवडते.
अलीकडेच, रॉकी सग्गु कॅपिटल नावाच्या एका इंस्टाग्राम क्रिएटरने अमरिक सुखदेवच्या प्रवासावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी या प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या व्यवसाय मॉडेलबद्दल आणि काही धक्कादायक आकडेवारीबद्दल सांगितले. त्यांच्या मते, आज हे रेस्टॉरंट दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपये कमावते.