Indian Railways : आता ट्रेनमध्ये तुमच्या आवडीच्या जेवणाचा आस्वाद घ्या! रेल्वेची 'ही' खास सुविधा सुरू...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 07:08 PM2021-02-03T19:08:43+5:302021-02-03T19:19:05+5:30

नवी दिल्ली : जर तुम्हीही ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आतापासून तुम्हाला खाद्यपदार्थांसाठी अजिबात चिंता करण्याची गरज नाही. भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवाशांसाठी ई-कॅटरिंग (e-catering service) सेवेची सुविधा सुरू केली आहे.

ही सेवा 1 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. मात्र, ठरविक रेल्वे स्थानकांवरच ई-कॅटरिंग सेवा सुरू झाली आहे. 250 ट्रेनमधील प्रवाशांना ही सुविधा 65 स्टेशनवर मिळणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने ई-केटरिंगची सेवा पूर्णपणे बंद केली होती. रेल्वेने सांगितले की, पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील मालदा टाउन, ओडिशामधील राउरकेला, झारखंडमधील टाटा स्टेशनवर मिळणार आहे.

याचबरोबर, पश्चिम बंगालमधील हावडा, सियालदह, आसनसोल, न्यू जलपाईगुडी, बिहारमधील पटना, आसाममधील गुवाहाटी, झारखंडमधील धनबाद, मध्य प्रदेशातील भोपाळ, महाराष्ट्रातील नागपूर, राजस्थानमधील कोटासह 65 रेल्वे स्थानकांची निवड झाली आहे. मात्र, उर्वरित स्थानकांवरही लवकरच ही सुविधा सुरू होईल.

प्रवासी ई-कॅटरिंग मोबाइल अ‍ॅप 'फूड ऑन ट्रॅक' च्या (Food on Track) माध्यमातून ऑर्डर करू शकतात, असे रेल्वेने सांगितले आहे. तुम्ही Google Play Store वरून हे 'फूड ऑन ट्रॅक' अ‍ॅप डाउनलोड करू शकता.

याशिवाय, तुम्ही आयआरसीटीसी ई-केटरिंगच्या अधिकृत वेबसाइट https://www.ecatering.irctc.co.in/ वरूनही आपल्यासाठी जेवण ऑर्डर करू शकता. रेल्वे प्रवाशांना त्यांच्या आसनावर बसून खाद्यपदार्थांच्या बुकिंगची सुविधा उपलब्ध करत आहे.

या सुविधेअंतर्गत, प्रवासी देशभरातील 500 हून अधिक रेस्टॉरंट्समधून त्यांचे आवडते खाद्यपदार्थ मागवू शकतात. यामध्ये प्रवाशांना मेन्यूमधून आवडीचे पदार्थ ऑर्डर करावे लागते.

त्यानंतर ते प्रवाशांच्या सीटपर्यंत पोहोचवले जाते. जेवणाची ऑर्डर देताना प्रवाशांना पीएनआर नंबर, रेल्वेचे नाव, सीट / बर्थ नंबर यासारख्या प्रवासाचा तपशील द्यावा लागतो.