Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल

By जयदीप दाभोळकर | Updated: September 8, 2025 09:15 IST2025-09-08T09:05:32+5:302025-09-08T09:15:40+5:30

Post Office Investment Scheme: गुंतवणूक ही आता काळाची गरज बनली आहे. जर तुम्ही योग्य ठिकाणी आणि योग्यरित्या अभ्यासपूर्वक गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

Post Office Investment Scheme: गुंतवणूक ही आता काळाची गरज बनली आहे. जर तुम्ही योग्य ठिकाणी आणि योग्यरित्या अभ्यासपूर्वक गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. परंतु यासाठी गुंतवणुकीसोबतच संयम असणंही तितकंच आवश्यक आहे. सरकारही गुंतवणूकीला प्रोत्साहन देत असून त्यांनी अनेक नव्या योजना सुरू केल्या आहेत.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक लोकप्रिय बचत योजना आहे. सध्या पीपीएफ योजनेवर वार्षिक ७.१ टक्के व्याज मिळत आहे. पीपीएफ योजनेअंतर्गत, तुम्हाला वर्षातून किमान एकदा पैसे जमा करावे लागतात.

तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही दरवर्षी पीपीएफ खात्यात एकरकमी रक्कम जमा करू शकता किंवा तुम्ही हप्त्यांमध्ये पैसे देखील जमा करू शकता. पीपीएफ खात्यात एका वर्षात किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५० लाख रुपये जमा करता येतात. जर तुम्ही हप्त्यांमध्ये पैसे जमा करत असाल तर तुम्ही फक्त ५० रुपयांचा हप्ता भरू शकता.

पीपीएफ खातं १५ वर्षांत मॅच्युअर होतं. पण तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फॉर्म भरून ते प्रत्येकी ५ वर्षांसाठी वाढवू शकता. पीपीएफ खातं कोणत्याही बँकेत उघडता येतं. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पीपीएफ खाते देखील उघडू शकता.

जर तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यात दरवर्षी ५०,००० रुपये जमा केले तर १५ वर्षांनंतर म्हणजेच मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण १३,५६,०७० रुपये मिळतील. आम्ही तुम्हाला सांगतो की यामध्ये तुमच्या गुंतवणुकीचे ७,५०,००० रुपये आणि व्याजाचे ६,०६,०७० रुपये समाविष्ट आहेत.

पीपीएफ खात्याबाबत तुम्हाला एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही वर्षभरात किमान ५०० रुपये जमा केले नाहीत तर तुमचं खातं बंद केलं जाईल. परंतु, दंड भरून ते पुन्हा सक्रिय केलं जाऊ शकतं. पीपीएफ खात्यासह तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळते.

जसं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की पीपीएफ ही एक सरकारी योजना आहे. म्हणून, या खात्यात जमा केलेला प्रत्येक पैसा पूर्णपणे सुरक्षित आहे. पीपीएफ खातं उघडल्यानंतर, तुम्ही ५ वर्षांपूर्वी पैसे काढू शकत नाही. ५ वर्षांनंतर, गंभीर आजार, मुलांचं शिक्षण अशा काही विशेष परिस्थितीतच पीपीएफ खात्यातून पैसे काढता येतात.