करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 14:41 IST2025-04-22T14:29:45+5:302025-04-22T14:41:25+5:30

Work Life Balance : या धावपळीच्या जीवनात, करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन एकत्रितपणे करणे हे एक दिव्य आहे. यासाठी तुम्हाला काही टीप्स फॉलो करणे आवश्यक आहे.

एका तरुणाला वर्षाला एक कोटी रुपयांचे पॅकेज होते. सोबत कंपनीचे घर, गाडी अशा अलिशान सुविधाही होत्या. कुणालाही आदर्श वाटावे असेच आयुष्य दिसत होतं. मात्र, त्यानंतरही आयुष्यात मजा येत नाही, असं कारण देत त्याने जीवन संपवलं. ही बातमी गेल्या वर्षीची आहे. सध्या अनेक तरुणांची अशी परिस्थिती दिसत आहे.

काहींना पगार पुरत नाही, तर काहीकडे इतक्या पैशांचं काय करायचं? असा प्रश्न पडतो. वर्क लाइफ बॅलन्स हा तर अलीकडच्या काळात परवलीचा शब्द झाला आहे. अशा परिस्थितीत करिअर, कुटुंब आणि आर्थिक नियोजन सांभाळणे ही तारेवरची कसरत झाली आहे. तुमच्याही आयुष्यात असेच काहीसे सुरू असेल तर हा लेख तुम्हाला मदत करू शकतो.

आजच्या धावपळीच्या जीवनात, प्रत्येकजण ऑफिस, घर आणि खर्च यांच्यात योग्य संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहे. कुटुंबाच्या अपेक्षा, वाढती महागाई आणि कामाचा ताण दररोज नवीन आव्हाने उभी करतो. पण काळजी करू नका, थोडीशी समज आणि योग्य नियोजन केल्यास तुम्ही आव्हानांना सहज तोंड देऊ शकता.

आठवड्याचं नियोजन : ऑफिसच्या मिटींगपासून ते मुलांच्या शाळेतील कार्यक्रमांपर्यंत, खरेदीपासून ते स्वतःला वेळ देण्यापर्यंत नियोजन करा. एक निश्चित वेळापत्रक तुम्हाला शेवटच्या क्षणी येणाऱ्या तणावापासून दूर ठेवण्यास मदत करते. कामाचा प्राधान्यक्रम ठरवताना मदत होईल.

कुटुंबियांशी मोकळेपणाने बोला : तुमच्या कामाचा ताण आणि आर्थिक उद्दिष्टांबद्दल तुमच्या जोडीदाराशी, मुलांशी आणि पालकांशी मोकळेपणाने बोला. यामुळे गैरसमज कमी होतील आणि एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल.

आर्थिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित करा : एक मजबूत बजेट हे चांगल्या आर्थिक आरोग्याचा कणा आहे. ५०-३०-२० बजेट नियमाचे पालन करा - ५०% गरजांसाठी, ३०% इच्छा आकांशासाठी आणि २०% बचतीसाठी ठेवा. खर्चाचा मागोवा घेण्यासाठी अॅप्स वापरा आणि संपूर्ण कुटुंबाला नियोजनात सहभागी करा.

कुटुंबाला सोबत घेऊन बजेट बनवा : दर महिन्याला, तुमच्या कुटुंबासोबत बसून आर्थिक नियोजन करा. जेव्हा सर्वजण सहभागी असतात तेव्हा खर्च समजून घेणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे होते.

तुमच्या खास मित्रांच्या संपर्कात राहा : तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या आणि आनंदी ठेवणाऱ्या मित्रांसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. सकारात्मक वर्तुळ तुम्हाला तणावापासून दूर ठेवते आणि मानसिक ऊर्जा देते.

मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका : सर्वकाही मीच करणार या अविर्भावात राहू नये. काही दिवसांसाठी करिअर महत्त्वाचे असेल, तर काही दिवसांसाठी तुम्हाला कुटुंबावर किंवा पैशावर लक्ष केंद्रित करावे लागेल. गरजेनुसार नियोजनात बदल करा. आवश्यक असल्यास मदत मागायला लाजू नका.