पत्नीच्या नावे SIP सुरू केल्यास किती द्यावा लागेल टॅक्स; जाणून घ्या काय आहे नियम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 11:33 IST2024-12-31T11:09:39+5:302024-12-31T11:33:34+5:30
Taxation on Mutual Funds Return: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीवर अवलंबून असली तरी त्यातील परतावा हा इतर पारंपारिक गुंतवणूकीच्या प्रकारांपेक्षा अधिक असतो. म्हणूनच त्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Taxation on Mutual Funds Return: भविष्याच्या दृष्टीनं हल्ली अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीवर अवलंबून असली तरी त्यातील परतावा हा इतर पारंपारिक गुंतवणूकीच्या प्रकारांपेक्षा अधिक असतो. म्हणूनच त्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
भारतीय शेअर बाजारात बऱ्याच काळापासून घसरण होत आहे. शेअर बाजारात सुरू असलेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओवरही वाईट परिणाम होत आहे. मात्र, हा तोटा होऊनही म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. इतकंच काय तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या महिलांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे.
एकीकडे देशातील नोकरी करणाऱ्या महिला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत, तर दुसरीकडे अनेक पुरुष आपल्या पत्नीच्या नावावर गुंतवणूक करत आहेत. जर तुम्हीही तुमच्या पत्नीच्या नावानं एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कराचे नियम माहित असायला हवेत.
म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. कॅपिटल गेन टॅक्सचं दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं.
जर तुम्ही तुमचे इक्विटी म्युच्युअल फंड युनिट वर्षभरात विकून पैसे काढले तर तुम्हाला २० टक्के शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. जर तुम्ही १ वर्षानंतर पैसे काढले तर तुम्हाला १२.५ टक्के कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. डेट फंडांवर तुम्हाला टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागतो.
म्युच्युअल फंडांच्या बाबतीत कराचे नियम महिला आणि पुरुष दोघांसाठीही सारखेच असतात. नव्या करप्रणालीनुसार महिलांचं वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. जुन्या कर पद्धतीनुसार महिला (६० वर्षांखालील) अडीच लाख रुपयांपर्यंत करमुक्त आहेत.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)