देशात नेमकं किती लोक कमावतात वार्षिक १०० कोटी? अन् किती लोक आहेत गरीब; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 07:15 PM2021-08-10T19:15:05+5:302021-08-10T19:19:43+5:30

केंद्र सरकारला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर अर्थ मंत्रालयाकडून लेखी उत्तर देण्यात आलं आहे. यात देशात नेमकं किती लोक वार्षिक १०० कोटी कमावतात याची माहिती मागण्यात आली होती.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी एका प्रश्नावर लेखी स्वरुपात उत्तर देताना राज्यसभेत एक महत्वाची माहिती दिली.

आयकर विभागातील माहितीनुसार देशात वार्षिक १०० कोटींचं उत्पन्न दाखवलेल्या नागरिकांची संख्या २०२०-२१ या वर्षात १३६ इतकी झाली आहे.

देशात वार्षिक १०० कोटींचं उत्पन्न कमावणाऱ्या व्यक्तींचा आकडा यंदाच्या वर्षात १३६ इतका झाला आहे. याआधी २०१९-२० सालात हा आकडा १४१ इतका होता. तर २०१८-१९ या वर्षात हा आकडा ७७ इतका होता.

लॉकडाऊन काळात देशातील कोट्याधीश लोकांच्या संख्येत वाढ झालीय का? असा सवाल राज्यसभेत विचारण्यात आला होता. याच्या उत्तरात अर्थमंत्रालयाकडून लेखी स्वरुपात सविस्तर माहिती देण्यात आली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डकडे (सीबीडीटी) उपलब्ध माहितीनुसार प्रत्यक्ष कराअंतर्गत अब्जाधीश शब्दाची कोणतीही वैधानिक किंवा प्रशासकीय परिभाषा नमूद नाही.

तेंडुलकर समितीच्या कार्यप्रणालीचं अनुकरण करताना भारतात दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींची संख्या २०११-१२ साली २७ कोटी इतकी होती.

''सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास'' यावर जोर देण्यासोबतच विविध योजनांच्या अंमलबजावणी करुन देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या जीवनशैलीत सुधारणा करणं हे सरकारचं लक्ष्य असल्याचंही अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.