SIP कसा करू शकते तुमचा बँक बॅलन्स दुप्पट? सनजून घ्याल गणित तर राहणार नाही कनफ्युजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 08:58 IST2025-01-13T08:51:59+5:302025-01-13T08:58:37+5:30
SIP Investment Money Double: गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपीचा उल्लेख नक्कीच होतो. पैसे कमविण्याच्या दृष्टीने हा खूप चांगला पर्याय मानला जातो.

SIP Investment Money Double: गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपीचा उल्लेख नक्कीच होतो. पोर्टफोलिओमध्ये त्याचा समावेश करण्याच्या सूचना बहुतांश तज्ज्ञ करत असतात. पैसे कमविण्याच्या दृष्टीने हा खूप चांगला पर्याय मानला जातो कारण त्यात मिळणारा परतावा सर्वच योजनांमध्ये मिळत नाही.
हेच कारण आहे की, मार्केट लिंक्ड स्कीम असूनही एसआयपीवरील लोकांचा विश्वास झपाट्यानं वाढला आहे. पण एसआयपीमुळे तुम्हाला नफा कसा मिळतो, हे गणित समजून घेतलं तर त्यात गुंतवणुकीबाबत तुमच्या मनात सुरू असलेल्या शंका दूर होतील.
युनिट्सचं वाटप - जेव्हा तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला काही युनिट्सचं वाटप केलं जातं. समजा जर एखाद्या म्युच्युअल फंडाचा एनएव्ही म्हणजेच नेट अॅसेट व्हॅल्यू २० रुपये असेल आणि तुम्ही त्या म्युच्युअल फंडात १००० रुपये गुंतवले तर तुम्हाला ५० युनिट्सचे वाटप केलं जाईल. आता म्युच्युअल फंडाची एनएव्ही जसजशी वाढेल तसतस तुमचे गुंतवलेले पैसेही वाढतील. जर म्युच्युअल फंडाची एनएव्ही ३५ रुपये झाली तर तुमच्या ५० युनिट्सची किंमत १००० रुपयांवरून १७५० रुपयांपर्यंत वाढेल.
असा वाढतो पैसा - जेव्हा तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून दर महिन्याला गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला दर महिन्याला युनिट्सचे वाटप केलं जातं. जेव्हा बाजारात तेजी असते, तेव्हा आपल्याला कमी युनिट्सचं वाटप केलं जातं आणि जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा आपल्याला आपल्या गुंतवणुकीच्या तेवढ्याच रकमेसाठी जास्त युनिट्स मिळतात. अशा प्रकारे बाजारातील चढ-उतारांचा धोका कमी होतो आणि आपली गुंतवणूक सरासरी किंमतीवर होते. तसेच यात कंपाउंडिंगचा फायदा होतो. म्हणजेच दर महिन्याला मिळणाऱ्या परताव्यावरही परतावा मिळतो. यामुळे तुम्हाला नफा झपाट्यानं मिळतो आणि भांडवल खूप वेगानं वाढतं.
जास्त एसआयपी जास्त फायदा - एसआयपीमध्ये कंपाउंडिंगचा फायदा जबरदस्त आहे. त्यामुळे एसआयपी जितका जास्त काळ राहिल तितका मोठा फायदा तुम्ही घेऊ शकाल. कारण कंपाउंडिंग अंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर परतावाही मिळतो आणि परताव्यावर परतावाही मिळतो. यामुळे दीर्घ मुदतीत बराच पैसा जमा होतो.
एसआयपी फ्लेक्सिबल - मोठा नफा देण्याबरोबरच एसआयपीची वैशिष्ट्येही खूप चांगली आहेत. एसआयपीमध्ये गुंतवणुकीचा कालावधी आणि रकमेबाबत लवचिकता असते. म्हणजेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार डेली, मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही गुंतवणुकीच्या कालावधीचा पर्याय निवडू शकता. याशिवाय एसआयपीमध्ये पॉजचा पर्यायही मिळतो. याचा फायदा घेऊन तुम्ही ठराविक कालावधीसाठी एसआयपी थांबवू शकता आणि नंतर पुन्हा तेथून सुरू करू शकता.
बचत शिकवते - एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही ठराविक कालावधीसाठी बचत करायला शिकता. तुम्हाला मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही जे काही पैसे गुंतवायचे आहेत, ती रक्कम वाचवल्यानंतरच तुम्ही उर्वरित रक्कम खर्च करता. त्यामुळे शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लागते.
(टीप - यामध्ये केवळ म्युच्युअल फंडाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)