'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 10:54 IST2025-12-14T10:40:44+5:302025-12-14T10:54:30+5:30

Asia Top Fundraiser : काही महिन्यांपूर्वी चीनमधील मंदीच्या सावटाखाली हाँगकाँग शेअर बाजार अडचणीत होता. गुंतवणूकदारांचा मूड खराब होता आणि आर्थिक उलाढाल थंडावली होती. मात्र, या वर्षी हे चित्र पूर्णपणे पालटले आहे.

२०२५ मध्ये हाँगकाँगचा शेअर बाजार इनिशियल पब्लिक ऑफरिंग, प्लेसमेंट आणि ब्लॉक ट्रेडमधून ७३ अब्ज डॉलरहून अधिक निधी उभारणीसह आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. २०१३ नंतर पहिल्यांदाच हाँगकाँगने हे स्थान मिळवले आहे.

हाँगकाँगच्या शेअर बाजारात शेअर्सची विक्री (फंड उभारणी) जवळपास चार पटीने वाढली आहे. जागतिक स्तरावर हाँगकाँग आता केवळ अमेरिकेच्या मागे आहे.

या तेजीला चीनी कंपन्यांनी प्रोत्साहन दिले आहे. कंटेंपररी एम्पेरेक्स टेक्नॉलॉजी (बॅटरी उत्पादक), बीवायडी (इलेक्ट्रिक वाहन) आणि शॉओमी (स्मार्टफोन) सारख्या कंपन्यांनी मोठे आयपीओ आणि शेअर प्लेसमेंट केले आहेत.

हाँगकाँगचा प्रमुख निर्देशांक हँग सेंग इंडेक्सने या वर्षात २९.५ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली आहे, जो २०१७ नंतरचा त्याचा सर्वोत्तम परफॉर्मन्स आहे.

हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजमध्ये सध्या जवळपास ३०० कंपन्या त्यांचे शेअर्स लिस्ट करण्याची वाट पाहत आहेत. यामुळे भविष्यातही बाजारपेठेत तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.

डील मेकिंग आणि फंड उभारणीच्या बाबतीत भारत आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या बाजारात बिलियन-डॉलरच्या डील्सची संख्या वाढली आहे.

भारतात देशांतर्गत म्युच्युअल फंड आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असल्याने, आयपीओने सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी निधी उभारणी केली आहे, जी २० अब्ज डॉलरहून अधिक आहे.

जागतिक स्तरावर फंड उभारणीसाठी असलेल्या पाच सर्वात मोठ्या ठिकाणांपैकी चार ठिकाणे (हाँगकाँग, भारत, चीन आणि जपान) एकट्या आशिया खंडात आहेत, ज्यामुळे या खंडातील आर्थिक ताकद स्पष्ट होते.