जगातील बडे देश कर्जाच्या ओझ्याखाली, जपानवर सर्वाधिक कर्ज तर भारताची आहे अशी परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 09:39 IST2026-02-18T09:31:03+5:302026-02-18T09:39:52+5:30
Highest Govt Debt To GDP: सध्याच्या स्थितीत जगभरात आर्थिक अनिश्चिततेचं वातावरण असताना जगातील बहुतांश बडे देश हे कर्जाच्या ओझ्याखाली दबत चालले आहेत. जपानसारख्या विकसित देशावरील कर्जही मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. यादरम्यान वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगभरातील देशांवर असलेल्या सध्याच्या सरकारी कर्जाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीनुसार कुठल्या देशावर किती कर्ज आहे. तसेच भारताची काय स्थिती आहे याची माहिती खालीलप्रमाणे.

सध्याच्या स्थितीत जगभरात आर्थिक अनिश्चिततेचं वातावरण असताना जगातील बहुतांश बडे देश हे कर्जाच्या ओझ्याखाली दबत चालले आहेत. जपानसारख्या विकसित देशावरील कर्जही मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. यादरम्यान वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगभरातील देशांवर असलेल्या सध्याच्या सरकारी कर्जाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीनुसार कुठल्या देशावर किती कर्ज आहे. तसेच भारताची काय स्थिती आहे याची माहिती खालीलप्रमाणे.

जगभरात सर्वाधिक सरकारी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या देशांच्या यादीमध्ये जपान पहिल्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटेस्टिक्सवर ट्रेंडिंग इकॉनॉमिक्सच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेली आखडेवारी पाहिल्यास जपान सरकारवर जपानच्या जीडीपीपेक्षा दुप्पट कर्ज आहे. तसेच ते जीडीपीच्या २३७ टक्के एवढं प्रचंड आहे. जपानचा जीडीपी सुमारे ४.२ ट्रिलियन डॉलर आहे. तर जपानवर २०२५ पर्यंत ८.६ ट्रिलियन डॉलर एवढं प्रचंड कर्ज आहे.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीवर नजर टाकली तर जपाननंतर सिंगापूर हा सर्वाधिक कर्जबाजारी असलेला देश आहे. सिंगापूरवर जीडीपीच्या १७३ टक्के एवढं सरकारी कर्ज आहे. त्यानंतर ग्रीसवर १५४ टक्के, इटलीवर १५४ टक्के एवढं कर्ज आहे.

कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचाही समावेश आहे. अमेरिकेवर देशाच्या जीडीपीच्या तुलनेत १२४ टक्के एवढं कर्ज आहे.

सर्वाधिक कर्जबाजारी असलेल्या देशांमध्ये अमेरिकेसोबत इतर काही प्रगत देशांचाही समावेश आहे. त्यामध्ये फ्रान्सवर ११३ टक्के, कॅनडावर १११ टक्के, बेल्जियमवर १०४ टक्के, स्पेनवर १०२ टक्के आणि पोर्तुगालवर ९३.६ टक्के एवढं कर्ज आहे. याबरोबरचच ब्रिटनवरदेखील जीडीपीच्या तुलनेत ९३.६ टक्के एवढं प्रचंड कर्ज आहे. तर युद्धाने होरपळलेल्या युक्रेनवर ८९.८ टक्के एवढं कर्ज आहे.

आता भारत आणि चीन या आशियामधील दोन मोठ्या देशांचा विचार केल्यास चीनवर जीडीपीच्या तुलनेत ८८.३ टक्के एवढं कर्ज आहे. तर भारतावर चीनपेक्षा खूप कमी कर्ज आहे. भारताच्या डोक्यावर जीडीपीच्या तुलनेत ८१.९ टक्के एवढं कर्ज आहे.

सर्वाधिक कर्जबाजारी देशांप्रमाणे सर्वात कमी कर्ज असलेल्या देशांचा विकास करायचा झाल्यास या यादीत स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. स्वित्झर्लंडवर जीडीपीच्या तुलनेत केवळ १५.७ टक्के एवढंच कर्ज आहे. त्याशिवाय रशियावरसुद्धा जीडीपीच्या तुलनेत केवळ १६.४ टक्के एवढं कर्ज आहे. एस्टोनिया, बुल्गारिया, तुर्की आणि सौदी अरेबिया या देशांवरदेखील खूप कमी कर्ज आहे.

















