महिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा, बदलले वेतनाबाबतचे हे नियम

By बाळकृष्ण परब | Published: December 1, 2020 01:32 PM2020-12-01T13:32:55+5:302020-12-01T13:39:40+5:30

Women Employees News : कोरोनाकाळात कामकाजाच्या पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. यादरम्यान, कामगार मंत्रालयाने महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

कोरोनाकाळात कामकाजाच्या पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. यादरम्यान, कामगार मंत्रालयाने महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये वेतनासोबतच काम करण्याच्या पद्धतींमध्ये बदल करण्याची योजना आखली आहे.

कामगार मंत्रालयाने संसदेमध्ये नव्या कामगार कोडचा प्रस्ताव दिला आहे. हा कायदा पारित झाल्यानंतर काही बाबी अधिक सुस्पष्ट होणार आहेत. नव्या कामगार कायद्याचा सर्वाधिक फायदा महिला कामगारांना होणार आहे.

या प्रस्तावानुसार महिलांना खाणकामासह अन्य क्षेत्रांमध्ये काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. एवढेच नव्हे तर वेतनाच्या बाबतीत त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय आधारकार्ड लिंक असलेल्या खात्यांमध्ये डिजिटल पद्धतीने रक्कम जमा करून महिलांना समान वेतन आणि किमान मजुरी निश्चित करण्यात आली आहे. याचा नोकरदार महिलांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

महिला श्रमिकांना खाणकाम, बांधकाम यासह सर्व क्षेत्रांमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत महिला श्रमिकांना खाणकाम आणि बांधकामासारख्या क्षेत्रात काम करण्याची परवानगी नव्हती. यामध्ये केवळ पुरुष श्रमिकच काम करू शकत होते.

सर्वांना समान वेतनाची तरतूद, तसेच डिजिटल पद्धतीने पगार होणार असल्याने महिलांना कमी वेतन मिळण्याची चिंता दूर होणार आहे. त्याशिवाय आतापर्यंत देशामध्ये असंघटीत क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला श्रमिकांना कमी वेतन दिले जात असे. मात्र नव्या कायद्यामुळे वेतनात होणारा भेदभावसुद्धा संपुष्टात येणार आहे.

आता पुरुष आणि महिला श्रमिकांना एकसमान वेतन देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. वेतन थेट योग्य व्यक्तीला मिळावे यासाठी डिजिटल पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे घोटाळ्याची शक्यता संपुष्टात येणार आहे.