Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
By जयदीप दाभोळकर | Updated: July 9, 2025 09:37 IST2025-07-09T09:29:38+5:302025-07-09T09:37:51+5:30
Senior Citizen Savings Scheme (SCSS) : निवृत्तीनंतर, जेव्हा पगार येणं बंद होतं, तेव्हा सर्वात मोठी चिंता असते ती घरखर्च चालवण्यासाठी नियमित उत्पन्नाची. चला या योजनेचे ५ मोठे फायदे समजून घेऊया आणि त्यातून तुम्ही दरमहा ₹ २०,५०० चं हमी उत्पन्न कसे मिळवू शकता ते जाणून घेऊया

निवृत्तीनंतर, जेव्हा पगार येणं बंद होतं, तेव्हा सर्वात मोठी चिंता असते ती घरखर्च चालवण्यासाठी नियमित उत्पन्नाची. जर तुम्हीही स्वतःसाठी किंवा तुमच्या पालकांसाठी वृद्धापकाळात उत्पन्नाचा सुरक्षितत आणि हमी स्रोत शोधत असाल, तर पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) तुमच्यासाठी आहे. ही एक उत्तम सरकारी योजना आहे जी तुमचे पैसे सुरक्षित ठेवतेच, शिवाय बँक एफडीपेक्षा त्यावर जास्त व्याज देखील देते. चला या योजनेचे ५ मोठे फायदे समजून घेऊया आणि त्यातून तुम्ही दरमहा ₹ २०,५०० चं हमी उत्पन्न कसे मिळवू शकता ते जाणून घेऊया.
निवृत्तीनंतर, लोक अशा ठिकाणी पैसे गुंतवू इच्छितात जिथे त्यांची रक्कम म्हणजेच कष्टानं कमावलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील. या बाबतीत ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme) योग्य आहे. ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक लघू बचत योजना आहे, जी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा सरकारी/खासगी बँकेच्या अधिकृत शाखेत उघडू शकता. त्यात तुमचे पैसे बुडण्याचा धोका नाही. सरकार तुमच्या मुद्दल आणि व्याज दोन्हीची पूर्ण हमी देते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी, SCSS ही सर्वाधिक व्याज देणाऱ्या योजनांपैकी एक आहे. त्याचा व्याजदर ८.२% हा सहसा देशातील मोठ्या बँकांच्या ५ वर्षांच्या मुदत ठेवी (FD) पेक्षा खूपच जास्त आहे. एकदा तुम्ही त्यात पैसे गुंतवले की, त्यावेळचा व्याजदर पूर्ण ५ वर्षांसाठी लॉक होतो. भविष्यात व्याजदर कमी झाले तरी, तुम्हाला ५ वर्षांसाठी त्याच उच्च दरानं व्याज मिळत राहील.
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना खात्यात (SCSS) एकरकमी रक्कम गुंतवून, तुम्ही निवृत्तीनंतरही स्वतःसाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. सध्या त्यावर ८.२% वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेत, दर ३ महिन्यांनी व्याज दिलं जातं, जे १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर आणि १ जानेवारी रोजी तुमच्या खात्यात येईल. व्याजाची रक्कम त्याच पोस्ट ऑफिसमधील तुमच्या बचत खात्यात जमा केली जाते. जर खातेधारकानं व्याजाची रक्कम काढली नाही, तर अशा व्याजावर अतिरिक्त व्याज म्हणजेच चक्रवाढ व्याज उपलब्ध नाही.
या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवू शकता. ८.२% दरानं तुम्हाला वार्षिक २,४६,००० रुपये व्याज मिळेल. या योजनेअंतर्गत व्याज तिमाही आधारावर दिलं जात असल्यानं, जर आपण ते ३ महिन्यांत विभागलं तर ते ६१,५०० रुपये होईल. म्हणजेच दर ३ महिन्यांनी तुमच्या खात्यात ६१,५०० रुपये येतील. जर ते मासिक आधारावर विभागलं तर उत्पन्न २०,५०० रुपये होईल.
ही योजना तुम्हाला चांगले उत्पन्न तर देतेच, पण कर वाचवण्यासही मदत करते. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर, तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत एका आर्थिक वर्षात ₹१.५ लाखांपर्यंत कर सूट मिळवू शकता.
या योजनेत गुंतवणूक करणं खूप सोपं आहे आणि त्याचे नियम देखील खूप सोपे आहेत. कोणताही भारतीय नागरिक ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. ज्यांनी VRS (स्वेच्छा निवृत्ती) घेतली आहे ते ५५ वर्षांच्या वयात (निवृत्तीच्या १ महिन्याच्या आत) देखील खाते उघडू शकतात. संरक्षण सेवांमधून निवृत्त झालेले कर्मचारी ५० व्या वर्षीही हे खातं उघडू शकतात.