खूशखबर! मोदी सरकार मध्यमवर्गासाठी लवकरच देणार मोठी भेट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 04:42 PM2020-08-08T16:42:23+5:302020-08-08T18:10:04+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार कर भरणाऱ्या मध्यमवर्गाला मोठी भेट देण्याची तयारी करत आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

एका कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, करदाता राष्ट्र निर्माण करणारे आहेत आणि सरकार त्यांच्यासाठी 'चार्टर ऑफ राइट्स' आणणार आहे.

जगातील काही देशांमध्ये करदात्यांसाठी चार्टर ऑफ राइट्स लागू करण्यात आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन आणि अमेरिका देशांचा समावेश आहे, असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "या चार्टर ऑफ राइट्समध्ये करदात्यांची जबाबदारी आणि अधिकारांचा उल्लेख केला जाईल. आम्ही करदात्यांचे हित लक्षात घेऊन हे प्रयत्न करीत आहोत."

दरम्यान, अर्थसंकल्पात करदात्यांसाठी चार्टर ऑफ राइट्सची घोषणा करण्यात आली होती. यासाठी संवैधानिक दर्जा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, यामुळे आयकर विभागामार्फत नागरिकांना वेळोवेळी सेवा पुरविली जाईल.

करदात्यांनाही यामध्ये काही नवीन अधिकार मिळू शकतात. मात्र, निर्मला सीतारमण यांनी या चार्टर ऑफ राईट्सबद्दल विस्तृत माहिती दिली नाही.

निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "आम्ही करदात्यांना कर प्रक्रिया सुलभ आणि सोपी करीत आहोत."

हे लक्ष्य साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने अनके उपाययोजना आखल्या आहेत.