रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 00:12 IST2025-06-29T23:50:01+5:302025-06-30T00:12:20+5:30
Indian Railway : सध्या, रेल्वे सुटण्याच्या चार तास आधी आरक्षण चार्ट (रिझर्वेशन चार्ट) तयार केला जातो, यामुळे प्रतीक्षा यादीतील (वेटिंग लिस्ट) प्रवाशांची गैरसोय होते.

रेल्वे विभाग प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. सर्वात मोठा बदल आरक्षण प्रणालीचा असणार आहे. यामुळे तिकिट बुकिंग प्रणाली आणखी पारदर्शक आणि सोयीस्कर होईल. प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी, त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही, याची माहिती मिळेल. सध्या, रेल्वे सुटण्याच्या चार तास आधी आरक्षण चार्ट (रिझर्वेशन चार्ट) तयार केला जातो, यामुळे प्रतीक्षा यादीतील (वेटिंग लिस्ट) प्रवाशांची गैरसोय होते.
या बदलाचा लांब पल्ल्याच्या प्रवासावर जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल. कारण अशा प्रवाशांना शेवटच्या क्षणापर्यंत कन्फर्मेशन संदर्भातील स्थिती स्पष्ट होत नसल्याने अडचणी येतात. ही नवी आरक्षण प्रणाली डिसेंबर २०२५ पर्यंत लागू केली जाईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच या सुधारणांचा आढावा घेत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.
तत्काळ तिकीट बुकिंगचे नियमही बदलणार - तत्काळ तिकिट बुकिंगच्या नियमांतही बदल होईल. रेल्वे बोर्डाच्या प्रस्तावानुसार, दुपारी २ वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांचा आरक्षण चार्ट एक दिवस आधी रात्री ९ वाजेयापर्यंत तयार केला जाईल. यामुळे, प्रतीक्षा यादीतील लोकांना त्यांच्या स्थितीसंदर्भात लवकर माहिती मिळेल. यामुळे त्यांना गरज भासल्यास पर्यायी प्रवास व्यवस्थाही करता येईल.
रेल्वेमंत्र्यांकडून प्रस्तावाला मंजुरी - या प्रस्तावाला रेल्वेमंत्र्यांनीही मंजुरी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तिकीट बुकिंग प्रणाली पारदर्शक, सोपी आणि प्रभावी असावी. प्रवाशांच्या अनुभवाला केंद्रस्थानी ठेवून सर्व प्रणाली अत्याधुनिक बनवाव्यात. तिकीट बुकिंगपासून प्रवासापर्यंतचा प्रत्येक टप्पा तंत्रज्ञानावर आधारित आणि प्रवाशांना अनुकूल असावा.
नवीन आरक्षण प्रणाली सुलभ करण्याचे काम सेंटर फॉर इन्फॉर्मेशन सिस्टमला देण्यात आले आहे. ही नवीन प्रणाली सध्याच्या क्षमतेपेक्षा सुमारे दहापट अधिक सक्षम असेल.
बुकिंग क्षमताही वाढेल. सध्या एका मिनिटात ३२ हजार तिकिटे बुक होतात. नवीन प्रणालीमध्ये दीड लाखांहून अधिक तिकिटे बुक होऊ शकतील. चौकशीची क्षमता देखील वाढेल. सध्या, मिनिटाला चार लाख एवढी चौकशी क्षमता आहे, जी ४० लाखांपर्यंत वाढेल.
नवीन प्रणालीमध्ये इतर अनेक सुविधा असतील. आरक्षण फॉर्म वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये देखील भरता येतील. तुमच्या पसंतीची जागा निवडण्याचा पर्याय देखील असेल. दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी विशेष सुविधा असतील. भाडे कॅलेंडरही असेल. यामुळे, कोणत्या दिवशी किती भाडे आहे, हेही दिसेल.
१ जुलैपासून तत्काळ तिकीट बुकिंगचा नियमही बदलणार - भारतीय रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंगच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता आपल्याला आधार कार्ड आणि ओटीपीशिवाय तत्काळ तिकिट बुक करता येणार नाही. १ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधार आधारित ओटीपी आवश्यक असणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. अर्थात आपले आयआरसीटीसी (IRCTC) खाते आधारशी लिंक नसेल, तर १ जुलैपासून आपल्याला तत्काळ तिकिटे बुक करता येणार नाही.
तत्काळ तिकीट बुकिंगचा नवा नियम असा - रेल्वे मंत्रालयाने, आधार प्रमाणीकरणाशिवाय तत्काळ तिकिटांचे बुकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम १ जुलैपासून लागू होईल. यानंतर, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार कार्ड अनिवार्य असेल, असे रेल्वेने म्हटले आहे.
असं करा आधार लिंक - यासाठी, सर्वप्रथम IRCTC च्या वेबसाइटवर जाऊन लॉगइन करा. आपले युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा. 'My Account' मध्ये जाऊन 'Link Your Aadhaar' ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर, आपला आधार क्रमांक आणि नाव टाका. यानंतर, रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला OTP टाकून नंतर सब्मिट म्हणा...