चांदी १ लाख रुपयांनी घसरली, सोनं ३३ हजारांनी आपटलं; काय आहे सोन्या-चांदीचा भाव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 12:33 IST2026-01-31T12:19:20+5:302026-01-31T12:33:02+5:30
Gold Silver Rate Crash: सोन्या-चांदीच्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. एकाच दिवसात चांदीचा भाव १ लाख रुपयांहून अधिक घसरला आहे.

Gold Silver Rate Crash: सोन्या-चांदीच्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण (Gold-Silver Price Crash) पाहायला मिळाली आहे. एकाच दिवसात चांदीचा भाव १ लाख रुपयांहून अधिक घसरला आहे, तर सोनंदेखील एका झटक्यात प्रति १० ग्रॅम ३३,००० रुपयांहून अधिक स्वस्त झालंय. केवळ वायदा बाजारातच नव्हे, तर देशांतर्गत बाजारातही या मौल्यवान धातूंच्या किमती अचानक कोसळल्या.

तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरला असून अखेर चांदीचा बुडबुडा फुटला (Silver Bubble Burst) आहे. अवघ्या एका दिवसात १ किलो चांदीची किंमत १ लाख रुपयांहून अधिक कमी झाली. 'एमसीएक्स'वर (MCX) गुरुवारी चांदी ३,९९,८९३ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती, मात्र शुक्रवारी वायदा बाजार बंद होताना चांदीचा दर २,९१,९२२ रुपयांवर आला. म्हणजेच एका झटक्यात चांदी १,०७,९७१ रुपयांनी स्वस्त झाली आहे.

गुरुवारीच चांदीने इतिहासात पहिल्यांदाच ४ लाख रुपयांचा टप्पा ओलांडून ४,२०,०४८ रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता. मात्र, तिथून अवघ्या एका दिवसात चांदी १,२८,१२६ रुपयांनी स्वस्त झाल्यानं गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसलाय.

चांदीप्रमाणेच सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर एका दिवसात ३३,११३ रुपयांनी घसरला आहे. एमसीएक्सवर गुरुवारी सोनं १,८३,९६२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं, जे शुक्रवारी १,५०,८४९ रुपयांपर्यंत खाली आलं. सोन्याने गुरुवारी १,९३,०९६ रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत आता सोने ४२,२४७ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सोन्या-चांदीच्या किमतीत आलेल्या या घसरणीमागे एक नाही तर अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफावसुली सुरू केली, ज्यामुळे विक्रीचा दबाव वाढला आणि किमती कोसळल्या. दुसरं कारण, अमेरिकन डॉलरमधील तेजी. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे इतर देशांतील गुंतवणूकदारांसाठी सोनं-चांदी खरेदी करणं महाग झालं, परिणामी मागणी घटली.

तिसरं कारण म्हणजे यूएस ट्रेझरी यील्ड. अमेरिकन ट्रेझरी यील्ड वाढल्यामुळे गुंतवणूकदारांना सुरक्षित बाँड्समध्ये अधिक परतावा दिसू लागला आहे आणि चौथं कारण म्हणजे भू-राजकीय आणि प्रशासकीय बदल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांमुळे जागतिक तणाव कमी होणं आणि 'यूएस फेड'मध्ये जेरोम पॉवेल यांच्या जागी केविन वॉर्श यांच्या एन्ट्रीच्या बातम्यांनीही किमतींवर दबाव निर्माण केला आहे.

















