२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 09:03 IST2025-12-30T08:49:57+5:302025-12-30T09:03:38+5:30

सोमवारी चांदीचा भाव २,५४,१७४ रुपये प्रति किलो या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, दुपारनंतर किमतीत २४,४७४ रुपयांची मोठी घसरण झाली.

Silver Price Falls: सोमवारी चांदीच्या किमतीत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. वायदा बाजारात सकाळी चांदीचा भाव २,५४,१७४ रुपये प्रति किलो या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, दुपारनंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे किमतीत २४,४७४ रुपयांची मोठी घसरण झाली.

या घसरणीमुळे चांदी २,२९,७०० रुपयांच्या निचांकी पातळीवर आली. ही घसरण केवळ भारतापुरती मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीच्या दरात मोठे चढ-उतार दिसून आले. विशेष म्हणजे, वायदा बाजारातील या घसरणीचा परिणाम सध्या तरी सराफा बाजारावर झालेला नाही. व्यापाऱ्यांच्या सततच्या खरेदीमुळे दिल्लीत चांदी ३,६५० रुपयांनी वधारून २,४०,००० रुपये प्रति किलो झाली. शुक्रवारी चांदी २,३६,३५० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

विश्लेषकांच्या मते, जागतिक स्तरावरील या घसरणीचा परिणाम येत्या काळात स्थानिक वायदा बाजारावर दिसून येईल. या वर्षात चांदीच्या स्पॉट किमतीत आतापर्यंत १,५०,३०० रुपयांची वाढ झाली असून गुंतवणूकदारांचा नफा सुमारे १७० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

जागतिक स्तरावर, मार्च २०२६ च्या करारातील चांदीच्या किमती त्याच्या विक्रमी पातळीपेक्षा झपाट्यानं घसरल्या, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कॉमेक्समध्ये चांदी ३.४९ डॉलर म्हणजेच ४.५१ टक्क्यांनी घसरून ७३.७१ डॉलर प्रति औंसवर राहिली. यापूर्वी चांदीने ८२.६७ डॉलर प्रति औंसचा उच्चांक गाठला होता.

या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय मल्टी कमोडिटी एक्सचेंजने प्रत्येक करारावरील शुल्क २० हजार डॉलरवरून वाढवून २५ हजार डॉलर केलं आहे. या शुल्कवाढीमुळे गुंतवणूकदारांनी नफा वसुलीसाठी विक्री सुरू केली, ज्याचा परिणाम किमतींवर झाला.

जगातील सर्वात मोठा चांदी उत्पादक देश असलेला चीन १ जानेवारी २०२६ पासून चांदीच्या निर्यातीवर कडक निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. चीन सरकार निर्यात परवान्याबाबत नवीन नियम लागू करू शकते, ज्यामुळे चांदीची जागतिक निर्यात मर्यादित होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जगभरात चांदीची टंचाई निर्माण होऊन किमतीत मोठी वाढ होऊ शकते.

दुसरीकडे, अमेरिकन उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांनी चांदीच्या वाढत्या किमतींवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्टही शेअर केलीये. हे चांगलं लक्षण नाही, कारण अनेक औद्योगिक प्रक्रियांमध्ये चांदीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते, असं त्यांनी नमूद केलंय.