शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम, सोनं ₹५,८११ तर चांदी ₹९,४९२ नं महागली, पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 10:26 IST

1 / 9
Gold-Silver Rate Live on MCX: इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे सोन्या-चांदीच्या दरात ऐतिहासिक दरवाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत होते. परंतु आता युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतीवर झालाय
2 / 9
MCX वर एप्रिल २०२६ च्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा वायदा भाव ५,८११ रुपये म्हणजेच ३.५% वाढून १,६७,९१५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. दुसरीकडे, ५ मार्च २०२६ च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा वायदा भाव ९,४९२ रुपये म्हणजेच ३.५% वधारून २,८४,४९० रुपये प्रति किलोवर पोहोचला.
3 / 9
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. व्यवहाराच्या सुरुवातीलाच सोने २ टक्क्यांहून अधिक वाढून ५,३९० डॉलर प्रति औंसच्या आसपास पोहोचलं. चांदीच्या किमतीत २.४ टक्क्यांची वाढ होऊन ती ९६.०४ डॉलरवर गेली आहे.
4 / 9
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यातच यात ३ टक्क्यांहून अधिक मजबूती आली होती. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती अधिक चिघळली जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले आणि इराणनंही अनेक देशांतील ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर दिलं. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूचीही बातमीही समोर आली आहे.
5 / 9
सोन्याच्या या दीर्घकालीन तेजीमागे केवळ या ताज्या घडामोडीच नाहीत, तर जागतिक भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आंतरराष्ट्रीय संबंधांमधील उलथापालथ ही देखील मोठी कारणं आहेत. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची सातत्यानं होणारी खरेदी आणि गुंतवणूकदारांचा सरकारी बाँड्स व चलनांऐवजी सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला ओढा यामुळे किमतींना आधार मिळत आहे.
6 / 9
जानेवारीच्या शेवटी ५,५९५ डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवरून थोडी घसरण झाली असली तरी, या वर्षात आतापर्यंत सोन्यानं सुमारे २५% परतावा दिलाय. फेब्रुवारीमध्ये सोन्याने सलग सातव्या महिन्यात वाढ नोंदवली, जो १९७३ नंतरचा सलग एका महिन्यातील वाढीचा सर्वात मोठा कालावधी आहे.
7 / 9
इराणसोबतच्या युद्धापूर्वीही अध्यक्ष ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक परराष्ट्र धोरण स्वीकारलं होतं. याच वर्षी जानेवारीमध्ये अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडलं होतं आणि ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या.
8 / 9
शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले आणि तेथील जनतेला इस्लामिक राजवटीविरुद्ध बंड करण्याचं आवाहन केलं. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही इस्रायलशिवाय कतार, संयुक्त अरब अमिराती, कुवैत आणि बहरीनमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रे डागली. यामुळे तेलाच्या किमतीत गेल्या चार वर्षांतील सर्वात मोठी उसळी पाहायला मिळाली. होर्मुजचा मार्ग प्रभावीपणे बंद झाल्यामुळे जागतिक कच्च्या तेल बाजारपेठेत खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे डॉलरही मजबूत झाला आहे.
9 / 9
'Pepperstone Group Ltd.' चे रणनीतीकार अहमद असिरी यांनीदेखील यावर भाष्य केलं. सोमवारी सोन्यातील ही तेजी वाढत्या अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांनी सुरक्षित ठिकाण शोधल्याचे सुरुवातीचे संकेत आहेत, असं ते म्हणाले.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीInvestmentगुंतवणूकMONEYपैसा