सोने खरेदीच्या विचारात असाल तर जरा थांबा; ४०,००० नी घसरू शकते, अमेरिकी एक्स्पर्टचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:48 IST2025-04-04T16:50:22+5:302025-04-04T17:48:49+5:30
Gold Rate Prediction : गेल्या महिनाभरात सोने ५००० रुपयांनी वाढले आहे. आता जी माहिती येतेय ती या सगळ्याला धक्का देणारी आहे.

गेल्या काही वर्षांत सोन्याने एवढी मोठी उसळी घेतली आहे की, आता सोने घेणे सामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. एवढेच नाही तर आता हे एवढे महागडे सोने अंगावर घालून मिरविणेही धोक्याचे झाले आहे. काही वर्षांचेच कशाला गेल्या महिनाभरात सोने ५००० रुपयांनी वाढले आहे. आता जी माहिती येतेय ती या सगळ्याला धक्का देणारी आहे. कारण येत्या काही महिन्यांत याच सोन्याची किंमत जवळपास ४० हजारांनी कोसळण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवशीच सोन्याच्या दरात १७०० रुपयांची घसरण झाली आहे. या क्षेत्रातील तज्ञांनुसार सोन्यातील किंमतीत होणारी ही घसरण पुन्हा सोने सामान्यांच्या आवाक्यात आणू शकते.
सोन्यात गुंतवणूक करण्याचा जर कोणी विचार करत असेल तर नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी, नाहीतर उद्या याच सोन्याची किंमत निम्म्यावर आली तर डोक्याला धरून बसावे लागण्याची वेळ येऊ शकते.
येत्या काही महिन्यांत सोन्याची किंमत ४० ते ५० हजारनी का घसरणार आहे. याची कारणे या एक्स्पर्टनी दिली आहेत. चला जाणून घेऊया...
येत्या काही महिन्यांत सोन्याच्या किमती ३८ ते ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतात असा अंदाज अमेरिकन विश्लेषक फर्म मॉर्निंगस्टारचा अंदाज आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती, मध्यवर्ती बँकांच्या धोरणांमुळे आणि अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याच्या किमतीत घसरण होऊ शकते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्काची घोषणा केल्यानंतर सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या आहेत. आर्थिक बाजारात सुधारणा झाल्यास सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
सोन्याच्या किंमती १८२० डॉलर प्रति औसपर्यंत जाऊ शकतात, असे मॉर्निंगस्टारचे विश्लेषक जॉन मिल्स यांनी म्हटले आहे. असे झालेतर भारतात सोन्याचा दर ५५००० रुपयांपर्यंत कमी होऊ शकतो.
दर महागल्याने वाढलेला पुरवठा आणि कमी झालेली मागणी हे याचे मुख्य कारण असणार आहे. सोन्याचे भाव जास्त असतात तेव्हा खाण कंपन्या अधिक सोने काढतात, यामुळे साठा वाढत जातो. सामान्य माणूस नाही तर मध्यवर्ती बँका आणि गुंतवणूकदार या सोने खरेदीच्या मागे लागलेले आहेत. आता त्यांचीही कॅपॅसिटी संपत चाललेली आहे.
यामुळे मागणी कमी होत आहे. यामुळे या बँका त्यांच्याकडील सोन्याची बाजारात विक्री करू शकतात. असे झाले तर सोन्याच्या दरात मोठी घरसण होणे निश्चित आहे.