सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 17:41 IST2026-04-12T17:33:09+5:302026-04-12T17:41:00+5:30
या युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून, सोने आपल्या उच्चांकी पातळीवरून जवळपास ५० हजार रुपयांनी खाली आले आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण होताना दिसत आहे. सर्वसाधारणपणे जागतिक अस्थिरता अथवा युद्धाच्या काळात सोन्या-चांदीची मागणी आणि दरही वाढतात. मात्र, अमेरिका-इराण युद्धात भारतीय बाजारपेठेत एक वेगळीच स्थिती बघायला मिळत आहे.

या युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून, सोने आपल्या उच्चांकी पातळीवरून जवळपास ५० हजार रुपयांनी खाली आले आहे.

युद्धकाळात सोन्याचांदीच्या दरात मोठी घसरण - युद्धाच्या गेल्या ४० दिवसांतील आकडेवारीचा विचार करता, २८ फेब्रुवारीला सोन्याचा दर १६४७३० रुपये प्रति १० ग्रॅम एवढा होता. जो १० एप्रिल रोजी १५०३०५ रुपयांवर पोहोचला. अर्थात केवळ युद्धकाळातच सोनं १४ हजार रुपयांहून अधिक स्वस्त झाले आहे.

चांदीचा विचार करता, २८ फेब्रुवारीला चांदी २५५००० रुपये प्रति किलो होती, जी १० एप्रिल रोजी २३९९३४ रुपये प्रति किलोवर आली आहे. चांदी आपल्या उच्चांकी दराचा विचार करता, १.९६ लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे.

एमसीएक्स (MCX) वर सोन्याने २.०२ लाख रुपये आणि चांदीने ४.३९ लाख रुपयांचा उच्चांकी टप्पा गाठला होता. गेल्या आठवड्यात दोन्ही देशांमध्ये 'सीझफायर'च्या चर्चेमुळे किमतीत किंचित वाढ झाली होती.

मात्र आता दोन्ही देसांतील शांतता चर्चा फिस्कटली आहे. दोन्ही देशांत अटींवरून सहमती न झाल्याने आणि 'हॉर्मुझ' सामुद्रधुनीचा वाद कायम असल्याने युद्ध आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. तेल आणि वायूच्या पुरवठा साखळीत अडथळे येण्याची शक्यता आहे. याच बरोबर सोन्या-चांदीच्या दरातही पुन्हा घसरण बघायला मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.


















