सोनं बनलं रिटर्नचा 'बादशाह', १२ महिन्यांत १ लाखांची गुंतवणूक वाढून झाली 'इतकी'; MF, FD रेसमध्येही नाही

By जयदीप दाभोळकर | Updated: April 16, 2025 12:49 IST2025-04-16T12:24:32+5:302025-04-16T12:49:02+5:30

कोरोना महासाथीनंतर शेअर बाजारात तेजी आली होती. परंतु आता त्यात चढ उतार दिसून येत आहेत. पण सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांचे मात्र अच्छ दिन आलेत.

कोरोना महासाथीनंतर शेअर बाजारात तेजी आली होती. परंतु आता त्यात चढ उतार दिसून येत आहेत. शेअर बाजारातील एकतर्फी तेजीमुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार झपाट्यानं वाढले आहेत. एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूकही सुरू झाली. मात्र, गेल्या वर्षभरापासून बाजारात सुरू असलेल्या उलथापालथीमुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्याचा परिणाम एसआयपी खात्यांवर दिसून आलाय.

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात लाखो एसआयपी खाती बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, सोन्यानं मात्र न थांबता गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिलाय. २०२४ नंतर २०२५ मध्ये गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्याचं कामही सोन्यानं केलंय. १ वर्षापूर्वी जर कोणी सोन्यात गुंतवणूक केली असेल तर त्याचा मोठा परतावा मिळाला असेल.

गेल्या वर्षभरात सोन्यानं आपल्या गुंतवणूकदारांना २८ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. अशा तऱ्हेनं जर एखाद्या गुंतवणूकदारानं वर्षभरापूर्वी सोन्यात १ लाख रुपये गुंतवले असते तर त्याच्या पैशांचं मूल्य आज १,२८००० रुपयांपर्यंत वाढलं असतं. २०२५ मध्ये आतापर्यंत सोन्यानं जवळपास १२% परतावा दिला आहे. तर २०२४ मध्ये सोन्यानं २०.३% परतावा दिला.

गेल्या २५ वर्षात सोन्यानं केवळ दोनवेळा निगेटिव्ह परतावा दिलाय. २००५ पासून सोन्यावरील सरासरी परतावा शेअर बाजारापेक्षा चांगला आहे. सोन्यानं २००० पासून शेअर बाजाराला मागे टाकत २००० ते २,०२७% परतावा दिला आहे, तर शेअर बाजाराने १,४७०% परतावा दिला आहे. तर गेल्या वर्षभरात शेअर बाजारानं जवळपास ८ टक्के आणि एफडीने गुंतवणूकदारांना ६.८ टक्के परतावा दिलाय.

जगभरात सुरू असलेल्या उलथापालथीमुळे सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. सध्या सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापारयुद्धामुळे सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. जगभरातील मध्यवर्ती बँका गेल्या अनेक वर्षांपासून सोने खरेदी करत आहेत. जगभरातील छोटे गुंतवणूकदारही सोन्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

सोन्याच्या दरात सातत्यानं होत असलेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळालाय. जोपर्यंत जागतिक परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत सोन्याच्या दरात वाढ सुरूच राहील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंही सोन्याला दुसरा विमा असं म्हणतात. कोरोनाच्या काळात सोन्यानंही हे सिद्ध केलंय. या सर्व घटकांमुळे सोन्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळत आहे.