स्टॉल लावण्यासाठी BMW मधून उतरतो; ₹२ प्लेटपासून 'दहीवड्या'ची झालेली सुरुवात; 'करोडपती चाट किंग'ची रंजक गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 09:46 IST2026-02-18T09:32:26+5:302026-02-18T09:46:14+5:30
मुकेश कुमार शर्मा यांनी खाद्यपदार्थांच्या जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिल्लीच्या नेहरू प्लेसमध्ये ते 'करोडपती चाट किंग' या नावानं प्रसिद्ध आहेत.

मुकेश कुमार शर्मा यांनी खाद्यपदार्थांच्या जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिल्लीच्या नेहरू प्लेसमध्ये ते 'करोडपती चाट किंग' या नावानं प्रसिद्ध आहेत. १९८९ पासून एका साध्या फोल्डिंग टेबलवर ते दहीवडे विकत आहेत. दररोज सकाळी ते घरी स्वतः सर्व साहित्य तयार करतात आणि त्यानंतर आपल्या लक्झरी बीएमडब्ल्यू (BMW) कारमधून नेहरू प्लेस येथील स्टॉलवर पोहोचतात.

त्यांच्या दहीवड्यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे १६ घटकांपासून बनवलेला खास मसाला आणि दररोज वापरलं जाणारे सुमारे ४० किलो ताजं दही. सुरुवातीला केवळ २ रुपये प्लेटप्रमाणे विकल्या जाणाऱ्या दहीवड्यांची किंमत आता ४० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. कोलकाता येथून सुरू झालेला हा व्यवसाय आता दिल्लीत स्थिरावला असून तो तीन पिढ्यांचा कौटुंबिक वारसा बनलाय.

नेहरू प्लेसमध्ये 'शर्माजी चाट वाले' म्हणून ओळखले जाणारे मुकेश कुमार शर्मा १९८९ पासून या व्यवसायात आहेत. बीएमडब्ल्यू कारमधून दुकानाचं सामान आणून ते रस्त्याच्या कडेला एका छोट्या टेबलवर आपला स्टॉल लावतात. याच स्टॉलवरून दहीवड्यांची बंपर विक्री करून ते कोट्यधीश झाले आहेत.

त्यांच्या चविष्ट पदार्थामुळे दुकानावर ग्राहकांच्या नेहमी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. कोणत्याही डामडौलापेक्षा ते साध्या पद्धतीने व्यवसाय करण्यावर भर देतात. ते कारमधून दह्याचे डबे आणि स्टीलचे मोठे भांडे आणतात. दहीवडे थंड ठेवण्यासाठी त्यात बर्फाचा मोठा तुकडा टाकला जातो आणि प्रत्येक ग्राहकासाठी ते स्वतः अत्यंत काळजीपूर्वक प्लेट तयार करतात.

मुकेश कुमार शर्मा यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात अवघ्या २ रुपये प्रति प्लेटनं केली होती. वाढती मागणी आणि गुणवत्तेमुळे आज ही किंमत ४० ते ५० रुपये झाली आहे. त्यांच्या चाटची चव हीच त्यांची सर्वात मोठी खासियत असून, स्वच्छता आणि उच्च दर्जासाठी हा स्टॉल ओळखला जातो.

दह्याला अधिक क्रीमी बनवण्यासाठी ते स्वतः ते फेटतात. या दहीवड्यांमध्ये १६ विविध घटकांपासून तयार केलेला स्पेशल मसाला वापरला जातो, जो त्यांच्या चवीचं खरं रहस्य आहे. हा स्टॉल सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू असतो आणि केवळ दिल्लीतूनच नव्हे तर शहराबाहेरूनही खवय्ये येथे दहीवडे खाण्यासाठी येतात.

मोठ्या प्रमाणावर आर्थिक यश आणि आलिशान जीवनशैली असूनही मुकेश कुमार शर्मा आजही अत्यंत नम्र आहेत. ते स्वतः ग्राहकांना दहीवडे वाढतात. स्ट्रीट फूडचा व्यवसाय सन्मानाचा आणि अत्यंत फायदेशीर असू शकतो, हे त्यांनी सिद्ध केलं आहे.

त्यांचं दुकान 'झोमॅटो'वरही लिस्ट आहे. मुकेश शर्मा यांची ही यशोगाथा शहरातील खाद्य संस्कृतीतील एक मोठं सत्य मांडते. स्त्यावरील खाद्यपदार्थांच्या व्यवसायातही कठोर परिश्रम आणि गुणवत्तेच्या जोरावर मोठे यश मिळवता येतं, याचं ते एक उत्तम उदाहरण आहेत. (सर्व फोटो - bhookhasher1)

















