Adani ग्रुपची दिवाळी! सर्व शेअर्स प्रचंड तेजीत; गौतम अदानींनी १ दिवसात ३५ हजार कोटी कमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 02:20 PM2022-04-05T14:20:41+5:302022-04-05T14:24:40+5:30

शेअर बाजारातील तेजीच्या लाटेत अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर प्रचंड वाढले असून, गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे.

आताच्या घडीला शेअर बाजारात तेजी असल्याचे दिसून येत आहेत. अनेकविध कंपन्या दमदार कामगिरी करत असून गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. यात अदानी ग्रुपही मागे नाही. Adani ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्स प्रचंड प्रमाणात वाढले असून, याचा मोठा फायदा गौतम अदानींना झाल्याचे सांगितले जात आहे.

देशातील श्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांनी (Gautam Adani) एकाच दिवशी तब्बल ३५ हजार कोटींची कमाई केली आहे. भांडवली बाजारात धडकलेल्या तेजीच्या लाटेत अदानी समूहातील सर्वच्या सर्व सातही कंपन्यांचे शेअर प्रचंड वाढले. यात अदानी यांच्यासह गुंतवणूकदारही मालामाल झाले आहेत.

या तेजीने अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून ते जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांच्या यादीत १० व्या स्थानावर विराजमान झाले आहेत. एकाच दिवसातील छप्परफाड कमाईमुळे अदानी यांच्या संपत्तीत ३५४०८ कोटींची वाढ झाली.

आता गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १०५ अब्ज डॉलर्स इतकी वाढली आहे. या वर्षात अदानी यांच्या संपत्तीत २८.२ टक्के वाढ झाली आहे. भांडवली बाजारात तेजीची लाट धडकली होती. या लाटेत Adani ग्रुपचे सर्वच शेअर वधारले.

अदानी एनर्जीच्या शेअरमध्ये ९ टक्के वधारला. अदानी टोटल गॅस या शेअरमध्ये ५.४३ टक्के वाढ झाली. अदानी पोर्टचा शेअर ४.२० टक्के वाढला. अदानी पॉवरचा शेअर ४.११ टक्के आणि अदानी विल्मरचा शेअर १.७० टक्के वाढला होता.

अदानी एंटरप्राइजेसचा शेअर १.०४ टक्के आणि अदानी ट्रान्समिशनचा शेअर १.०२ टक्के वाढला होता. मागील दोन वर्षात जगभरात करोना संकट होते मात्र याच काळात गौतम अदानी यांनी अदानी समूहाचा विविध क्षेत्रात विस्तार केला.

या दोन वर्षात अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. ते काहीकाळ भारत आणि आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक बनले होते. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी जगातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत ११ व्या स्थानी आहेत.

अंबानी यांची एकूण संपत्ती १०० अब्ज डॉलर्स इतकी आहे. या वर्षी अंबानी यांच्या संपत्तीत ९.९७ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. अंबानी आणि अदानी यांच्या संपत्तीत केवळ ५ अब्ज डॉलर्सची तफावत आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धानंतर जागतिक कमॉडिटी बाजारात इंधन आणि नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाली. याचा फायदा अदानी समूहाला होणार असल्याने समूहातील सर्वच शेअर मागील महिनाभरात चांगलेच वधारले आहेत.