पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:36 IST2026-04-03T16:30:37+5:302026-04-03T16:36:01+5:30

Financial Planning Tips: महिना सुरू झाला की पगाराचा आनंद काही दिवसांतच विरून जातो आणि तिसऱ्या आठवड्यापासूनच 'बजेट' कोलमडू लागते, ही आज अनेक नोकरीपेशा वर्गाची मुख्य समस्या बनली आहे. हाताशी पैसे न उरल्यामुळे किरकोळ खर्चासाठीही दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र, आपल्या काही सवयींमध्ये थोडा बदल केला, तर केवळ पैसे वाचवता येणार नाहीत, तर संपूर्ण महिना तणावमुक्तपणे मॅनेज करता येईल. जाणून घेऊया काही महत्त्वाच्या आर्थिक टिप्स.

अनेकदा पगार वाढला की लोक लगेच आपला खर्चही वाढवतात. नवीन महागडा फोन, गाडी किंवा लक्झरी वस्तूंची खरेदी सुरू होते. यालाच 'लाइफस्टाइल इन्फ्लेशन' म्हणतात. उत्पन्न वाढले की खर्च वाढवण्याऐवजी गुंतवणुकीला प्राधान्य द्या. यामुळे तुमचे भविष्य सुरक्षित राहील आणि महिनाअखेर पैशांची चणचण भासणार नाही.

पर्सनल लोन घेणे सोपे वाटते, पण ते सर्वात महागडे असते. यावरील व्याजाचा दर खूप जास्त असतो आणि हप्त्याचा बोजा दीर्घकाळ टिकतो. जोपर्यंत अत्यंत निकडीची गरज नसेल, तोपर्यंत वैयक्तिक कर्ज घेऊ नका. किरकोळ गरजांसाठी कर्ज घेण्याची सवय तुम्हाला कर्जाच्या जाळ्यात अडकवू शकते.

कर्ज घेताना तुमच्या उत्पन्नाचा अचूक अंदाज असणे गरजेचे आहे. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, तुमच्या सर्व कर्जांचा एकूण ईएमआय हा तुमच्या एकूण उत्पन्नाच्या २५ ते ३० टक्क्यांच्या आतच असावा. त्यापेक्षा जास्त कर्ज घेतल्यास उर्वरित महिना चालवणे कठीण होऊ शकते.

आयुष्यात कधीही वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते. अशा वेळी कोणासमोर हात पसरण्यापेक्षा स्वतःचा साठवलेला पैसा मदतीला येतो. तुमच्या किमान ६ महिन्यांच्या खर्चाचा समावेश असलेला एक 'इमर्जन्सी फंड' तयार ठेवा. यामुळे संकट काळातही तुमचे मासिक बजेट बिघडणार नाही.

अनेकजण क्रेडिट कार्ड म्हणजे 'फ्री मनी' समजण्याची चूक करतात. मात्र, यावरील अव्वाच्या सव्वा व्याज तुमचे बजेट कोलमडवून टाकू शकते. तुमच्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेच्या केवळ ३० ते ४० टक्क्यांपर्यंतच खर्च करा. वेळेवर बिल भरल्यास दंड टाळता येईल आणि सिबिल स्कोरही सुधारण्यास मदत होईल.