आयटीआर जरूर भरा... पाहा कोणते आहेत फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 12:32 PM2022-07-15T12:32:00+5:302022-07-15T12:44:32+5:30

तुम्ही जरी प्राप्तिकराच्या कक्षेत येत नसाल तरीही तुम्ही विवरणपत्र भरावे. अनेक जण आयटीआर भरणे टाळतात. मात्र त्यामुळे मोठे नुकसान होते

तुम्ही जरी प्राप्तिकराच्या कक्षेत येत नसाल तरीही तुम्ही विवरणपत्र भरावे. अनेक जण आयटीआर भरणे टाळतात. मात्र त्यामुळे मोठे नुकसान होते. तुम्ही आयटीआर फाइल केल्यास तुम्हाला अनेक फायदे आहेत. कोणते नेमके फायदे आहेत हे जाणून घेऊ...

कर रिफंडसाठी दावा - कर रिफंडचा दावा करण्यासाठी, आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे. तुम्ही आयटीआर फाइल करता तेव्हा त्याचे मूल्यांकन हाेते. परतावा दिल्यास, तो थेट बँक खात्यात जमा होतो.

व्हिसासाठी आवश्यक - अनेक देशांचे व्हिसा अधिकारी व्हिसासाठी आयटीआर मागतात. ज्या व्यक्तीला त्यांच्या देशात यायचे आहे, त्याची आर्थिक स्थिती काय आहे हे तपासले जाते. ते व्हिसा नाकारूही शकतात.

उत्पन्नाचा पुरावा - आयटीआर दाखल करताना एक प्रमाणपत्र मिळते. जिथे आपण नोकरी करतो तेथून फॉर्म १६ दिला जातो. हा एक उत्पन्नाचा नोंदणीकृत पुरावा असणे क्रेडिट कार्ड, कर्ज किंवा स्वतःचे क्रेडिट सिद्ध करण्यास महत्त्वाचे ठरते.

बँक कर्ज मिळण्याची सोय - आयटीआर सर्व सरकारी आणि खासगी संस्थांनी उत्पन्नाचा पुरावा म्हणून स्वीकारले आहे. जर तुम्ही नियमितपणे आयटीआर फाइल करत असाल तर तुम्हाला बँकेकडून सहज कर्ज मिळू शकते.

पत्त्याचा पुरावा म्हणून - आयटीआर पावती तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविली जाते, जी पत्त्याचा पुरावा म्हणून काम करू शकते. याशिवाय, ते तुमच्यासाठी उत्पन्नाचा पुरावा म्हणूनही काम करते.

व्यवसाय सुरू करण्यासाठी - तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आयटीआर भरणे आवश्यक आहे. याशिवाय कोणत्याही विभागासाठी करार करायचा असेल तर आयटीआर दाखवावा लागेल. कंत्राट मिळवण्यासाठी गेल्या ५ वर्षांचा आयटीआर द्यावा लागतो.

विमा कंपन्यांकडून होते मागणी - तुम्हाला एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण (टर्म प्लॅन) घ्यायचे असेल, तर विमा कंपन्या तुम्हाला आयटीआर मागू शकतात. त्या तुमच्या उत्पन्नाचा स्रोत जाणून घेण्यासाठी तपासण्यासाठी आयटीआर मागतात.