Gold price today : धनत्रयोदशीच्या आधी सोन्याच्या दरात घसरण; रेकॉर्ड स्तरापेक्षा 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 11:58 AM2021-10-27T11:58:17+5:302021-10-27T12:12:38+5:30

Gold price today : मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमतीत (Gold rate) 0.10 टक्के घसरण झाली आहे.

सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्याचे नियोजन करणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धनत्रयोदशीच्या (dhanteras 2021) आधी सोन्याच्या दरात (Gold price today) घट दिसून येत आहे.

आज, बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमतीत (Gold rate) 0.10 टक्के घसरण झाली आहे. या घसरणीनंतर आज सोने प्रति तोळा 47,765 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी (silver price today) दरात वाढ झाली आहे. MCX वर चांदी 0.09 टक्के वाढीसह 65,050 रुपयांवर व्यवहार करत आहे.

गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर 2020 च्या नुसार पाहिले तर सध्या तरी सोने 4 हजार रुपयांपर्यंत स्वस्त आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,079 रुपये होती, आज सोन्याची किंमत 47,765 रुपये आहे. अशा स्थितीत अजूनही उच्चांकी स्तरावरून 3,314 रुपये स्वस्त विकले जात आहे.

सोन्याच्या सध्याच्या किमती पाहता, आता सोन्यात गुंतवणूक करायची की नाही, असा प्रश्न गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्या मोठ्या वर्गासमोर पडला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही काळापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.

सोन्याच्या खरेदीबाबत लोकांच्या मनात हिच भावना कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तसेच, ग्राहकांनी सध्याच्या किंमतीवर खरेदी केल्यास, प्रत्येक 10 ग्रॅमसाठी 2,500 रुपयांपेक्षा जास्त कमाई केली जाऊ शकते.

डॉलरच्या कमजोरीमुळे अलीकडच्या काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय, सणासुदीच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांकडून वाढलेल्या मागणीचा परिणामही सोन्याच्या किमतीवर दिसून येत आहे. भारतात कोरोना महामारीनंतर सोन्याच्या आयातीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

दुसरीकडे, स्पॉट मार्केटमध्येही सोन्याचे भाव वाढत आहेत. यासोबतच जागतिक ट्रेंडचा फायदाही सोन्याला मिळत आहे. त्याचवेळी, अमेरिकेच्या ट्रेझरी बाँड्सचे उत्पन्न वाढणे देखील सोन्याच्या किमतीला समर्थन देत आहे. एवढेच नाही तर कच्च्या तेलाच्या किमतीतही सोन्याला पाठिंबा मिळत आहे.

तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.

या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.