बँक बुडाली तरी ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम सुरक्षित राहणार, सरकार करत आहे ‘अशी’ व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 09:32 IST2025-02-18T09:22:03+5:302025-02-18T09:32:20+5:30

सध्या एखाद्याच्या खात्यात १० लाख रुपये जमा असतील आणि बँक बुडालीतर फक्त ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळतं. परंतु आता सरकार ग्राहकांना दिलासा देण्याच्या विचारात आहे.

केंद्र सरकार बँक ठेवींवरील विमा संरक्षण वाढवण्याची शक्यता आहे. सध्या एखाद्याच्या खात्यात १० लाख रुपये जमा असतील आणि बँक बुडालीतर फक्त ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळतं. परंतु आता सरकार ग्राहकांना दिलासा देण्याच्या विचारात आहे.

डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अॅक्ट (DICGC) अंतर्गत हे विमा संरक्षण पाच लाख रुपयांपेक्षा अधिक करण्याचा विचार सरकार करत आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सोमवारी ही माहिती दिली. जर असा निर्णय झाला तर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

नुकताच न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा उघडकीस आलाय. यानंतर आता सरकारच्या हालचाली सुरू झाल्यात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांच्या उपस्थितीत या प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी मिळताच अधिसूचना जारी केली जाईल. दरम्यान, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संकटावर भाष्य करण्यास त्यांनी नकार देत हे प्रकरण रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित असल्याचं सांगितलं.

डीआयसीजीसी या विम्यावर ठेवीदाराला थेट कोणताही प्रीमियम आकारत नाही. हा प्रीमियम बँकांकडून भरला जातो. बँक बंद झाल्यासच डिपॉझिट गॅरंटी लागू होते. जेव्हा एखादी बँक बुडते, तेव्हा ठेवीवरील विमा क्लेम सक्रिय होतो. पीएमसी बँक घोटाळ्यानंतर २०२० मध्ये डीआयसीजीसी विम्याची मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली होती.

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी कांदिवलीतील बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन (५८) याला अटक केली. अटकेत असलेल्या महाव्यवस्थापक हितेश मेहताचे ७० कोटी त्याच्या ताब्यात असल्याचं समजताच ही कारवाई करण्यात आली. दोघांना न्यायालयाने २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, तसंच उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाईचा पोलीस शोध घेत आहेत.

मेहताने अटकेनंतर १२२ कोटी ताब्यात असल्याचा कबुलीनामा आरबीआयला सादर केला आहे. त्याच्या चौकशीतून कांदिवलीतील धर्मेशचं नाव समोर आलं. मेहताकडून मे व डिसेंबर, २०२४ दरम्यान पावणेदोन कोटी, तसेच जानेवारीत ५० लाख अशी गुन्ह्यातील अपहार केलेली रक्कम धर्मेशकडून मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

२०२० ते २०२५ या कालावधीत हा गैरव्यवहार झाल्याचं तक्रारीत म्हटलंय. बँकेच्या एका अधिकाऱ्यानं आर्थिक गुन्हे शाखेला दिलेल्या माहितीनुसार बँकेच्या खात्याच्या वह्या आणि रोख रकमेत अनियमितता आढळून आली आहे. दादर आणि गोरेगाव शाखेतून अनियमितपणे पैसे काढल्याचं तपासात उघड झालं असून, त्यामागे हितेश मेहताचा हात असल्याचं सांगण्यात येतंय.