गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करता आली नाही? टेन्शन नको; अशा प्रकारे छोट्या बचतीतून उभी करू शकता मोठी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 08:50 IST2025-02-15T08:32:29+5:302025-02-15T08:50:09+5:30

Gold Investment: भारत सरकारने सॉवरेन गोल्ड बाँड म्हणजेच एसजीबी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सोन्यात गुंतवणूकीचे अनेक पर्याय आहेत. जाणून घेऊ कशाप्रकारे तुम्ही सोन्यात गुंतवणूक करून कमाई करू शकता.

Gold Investment: भारत सरकारने सॉवरेन गोल्ड बाँड म्हणजेच एसजीबी (Gold Bond Scheme) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डिजिटल गोल्डला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं सरकारनं २०१५ मध्ये सॉवरेन गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. यामुळे गुंतवणूकदारांना स्वस्त दरात शुद्ध सोनं खरेदी करण्याची संधी मिळाली.

या स्कीममध्ये मॅच्युरिटीवर गुंतवणूकदाराला बाजारभावाप्रमाणे पैसे मिळत असत, त्याशिवाय वार्षिक २.५ टक्के व्याज दिलं जायचं. यामुळे त्यांना दुप्पट नफा झाला. परंतु आता ही स्कीम बंद करण्यात आलीये. या सरकारी योजनेत गुंतवणूक चुकली असली तरी सोन्यात गुंतवणुकीचे सर्व मार्ग तुमच्याकडे आहेत. याबद्दल आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. मासिक एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंडात किमान ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डिमॅट खात्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंड हाऊसच्या माध्यमातून यात गुंतवणूक सुरू करू शकता.

Gold ETF हा म्युच्युअल फंडांचा गुंतवणुकीचा पर्याय आहे, जो सोन्याच्या घसरत्या किंवा चढत्या किमतींवर आधारित असतो. येथे तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता. शेअर्सप्रमाणेच बीएसई आणि एनएसईवर गोल्ड ईटीएफ ची खरेदी-विक्री करता येते. ईटीएफ युनिट्समध्ये खरेदी केले जातात. एक गोल्ड ईटीएफ युनिट म्हणजे १ ग्रॅम सोने. जर तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर तुम्ही एक-दोन युनिट सोनं खरेदी करू शकता.

तुम्हाला हवं असेल तर डिजिटल सोनंही खरेदी करू शकता. यात २४ कॅरेट शुद्धता, शून्य जोखीम आणि १०० टक्के लिक्विडिटी आहे. आपण आपल्या खिशाला परवडेल असं डिजिटल सोनंही खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला ४० ते ५० हजार रुपयांची गरज नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त १ रुपयात ते खरेदी करू शकता.

डिजिटल गोल्डमध्ये लॉक-इन पीरियड नाही. डिजिटल सोनं २४/७ ऑनलाइन खरेदी/विक्री करता येतं. गुगल पे, पेटीएम आणि फोनपे सारख्या अॅप्समधून तुम्ही डिजिटल सोनं खरेदी करू शकता. आजच्या काळात ही अॅप्स प्रत्येकाच्या फोनमध्ये असतात.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)