Coronavirus: सोन्याचे दर पाहिलेत का?... कोरोनानंतरच्या कठीण काळाची असू शकते चाहूल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 08:05 PM2020-05-18T20:05:08+5:302020-05-18T20:54:22+5:30

Coronavirus news in Marathi : केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला गती आणि उद्योगविश्वाला बळ देण्यासाठी विक्रमी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे.

गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोरोना नावाच्या अदृश्य विषाणूनं अख्ख्या जगाला अक्षरशः वेठीस धरलं आहे. या विषाणूशी लढू शकणारं औषध किंवा त्याला संपवू शकणारी लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. मात्र, अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय.

कोरोना विषाणूला हरवण्यासाठी 'फिजिकल डिस्टन्सिंग' हा एकमेव पर्याय सध्या अस्तित्वात आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. उद्योग-व्यवसाय-व्यवहार ठप्प असल्यानं महासत्ता म्हणवणाऱ्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थाही कोलमडल्यात; तर छोट्या देशांची अवस्था काय असेल, याचा अंदाज आपण लावू शकतो. भारताची आर्थिक स्थितीही तशी नाजुकच आहे.

एकीकडे अर्थव्यवस्था संकटात असताना, सोन्याला मात्र लख्ख झळाळी आल्याचं पाहायला मिळतंय. आज सलग दुसऱ्या दिवशी सोनं चकाकलं आणि किमतीने नवा उच्चांक गाठला.

केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला गती आणि उद्योगविश्वाला बळ देण्यासाठी विक्रमी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. पण, बहुधा शेअर बाजाराला हे पॅकेज फारसं पसंत पडलं नसावं. कारण, आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार १०६८ अंशांनी गडगडला.

सर्वसाधारणपणे, शेअर बाजारात अस्थिरता असते, तेव्हा गुंतवणूकदारांना सोनं आकर्षित करतं. त्यानुसारच, सेन्सेक्स जसजसा खाली येत गेला, तसतसं सोन्याचे दर वधारले. आज १० ग्रॅम सोन्याची किंमत ४७ हजार ९२९ रुपयांपर्यंत पोहोचली.

मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज अर्थात एमसीएक्सवर सोन्यानं ३६९ रुपयांची उसळी घेतली आणि ४७ हजार ७५० रुपयांवर मजल मारली. या व्यवहारांदरम्यान सोन्याच्या दरानं ४७ हजार ९२९ या उच्चांकाला स्पर्श केला.

सोन्यातील गुंतवणूक ही भरवशाची मानली जाते. सध्याचा काळ पाहता, सामान्य गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडेच दिसतोय. शेअर्समधून चांगले रिटर्न मिळतील, याबद्दल त्यांना शाश्वती नाही. याचाच अर्थ, कोरोनापाठोपाठ आर्थिक संकट आ वासून उभं आहे आणि आपल्याला त्यांना तोंड द्यावं लागू शकतं.

येत्या काही दिवसांत एमसीएक्सवर सोन्याचे दर ५० हजारांच्या पलीकडे जातील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची चांगलीच चमकताना दिसतेय. सोमवारी चांदीचा प्रतिकिलो दर ४८,०५३ रुपये होता.