भारत-अमेरिका करारावरून व्हाईट हाऊसमध्ये गोंधळ, ऑडिओ क्लिप व्हायरल... ट्रम्प यांच्यावर सिनेटरचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 10:31 IST2026-01-27T10:20:41+5:302026-01-27T10:31:24+5:30

India America Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. एका अमेरिकन सिनेटरच्या ऑडिओ क्लिपनुसार, या प्रकरणामुळे रिपब्लिकन गटात वाद निर्माण झाला आहे. पाहा नक्की काय आहे प्रकरण?

India America Trade Deal: डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ' धमक्यांचं सत्र सुरूच असून भारत-अमेरिका व्यापार करार (India-US Trade Deal) अद्यापही प्रलंबित आहे. या मुद्द्यावरून खुद्द अमेरिकन व्हाईट हाऊसमध्येच मतभेद असल्याचे समोर आले आहे. एका नवीन गौप्यस्फोटामुळे रिपब्लिकन पक्षामध्ये या करारावरून असलेला तणाव उघड झाला असून, एका अमेरिकन सिनेटरनंच या विलंबासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाला जबाबदार धरलं आहे.

'एक्सिओस'च्या अहवालानुसार, अमेरिकन सिनेटर टेड क्रूझ यांनी भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंबासाठी ट्रम्प प्रशासनातील प्रमुख व्यक्तींना दोषी ठरवले आहे. भारतीय निर्यातीवर अमेरिकन टॅरिफ ५०% इतक्या उच्च पातळीवर असताना हा करार रखडला आहे.

एका लीक झालेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगनुसार, क्रूझ यांनी आपल्या समर्थकांना सांगितलं की, भारतासोबतचा व्यापार करार सुरक्षित करण्यासाठी ते व्हाईट हाऊसशी लढा देत आहेत. जेव्हा त्यांना या कराराला कोण विरोध करत आहे असं विचारलं गेलं, तेव्हा त्यांनी थेट पीटर नवारो, जेडी वॅन्स आणि स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेतलं.

लीक झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये सिनेटर क्रूझ यांनी खाजगी चर्चेत स्पष्ट केलं की, व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो, उप राष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत-अमेरिका व्यापार कराराच्या प्रगतीत अडथळे निर्माण करत आहेत.

गेल्या ५ महिन्यांपासून भारतावर ५०% टॅरिफ लागू असूनही कराराबाबत अनिश्चितता कायम आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये चर्चा पुढे नेण्यास संमती मिळाल्यानंतर गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये औपचारिक वाटाघाटी सुरू झाल्या होत्या.

दुसरीकडे, गेल्या आठवड्यात दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात एक चांगला करार होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रशंसा केली होती. मात्र, आता समोर आलेली ऑडिओ क्लिप ट्रम्प यांच्या या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. बिझनेस स्टँडर्डनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. परंतु त्यांनी या ऑडिओ क्लिपची पुष्टी केलेली नाही.

सिनेटर क्रूझ यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे होणाऱ्या आर्थिक आणि राजकीय जोखमींबद्दल इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं की, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घोषित केलेलं टॅरिफ लागू करण्यापासून त्यांनी आणि इतर रिपब्लिकन सिनेटर्सनी ट्रम्प यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. या टॅरिफमुळे अमेरिकेतील महागाई वाढू शकते आणि लोकांच्या 'रिटायरमेंट सेव्हिंग'वर परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

क्रूझ यांच्या मते, या धोरणांमुळे २०२६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचं नुकसान होऊ शकतं. टॅरिफच्या प्रतिकूल परिणामांमुळे रिपब्लिकन पक्ष व्हाईट हाऊस आणि सिनेटवरील आपले नियंत्रण गमावू शकतो आणि डेमोक्रॅट्स पुन्हा सत्तेत येऊ शकतात, असा तर्क त्यांनी मांडला आहे. या ऑडिओ क्लिपमुळे ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावरून रिपब्लिकन नेत्यांमध्ये असलेली चिंता आणि अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.