ऐकावं ते नवलच! जिवंतपणी मरणाचा अनुभव घेण्यासाठी लोक मोजतायत हजारो रुपये, कंपनी झाली मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:00 IST2026-03-10T11:37:47+5:302026-03-10T12:00:36+5:30
Coffin Lounge : कोण कशाचा बिझनेस करेल काही सांगता येत नाही. अशीच एक बिझनेस आयडिया सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जपानमधील अनेक कंपन्या आता लोकांना 'जिवंतपणी' शवपेटीत झोपवण्याची सेवा देत आहेत. आश्चर्य म्हणजे लोकांचा याला मोठा प्रतिसाद मिळत असून यातून पैसेही कमावले जात आहेत.

काय आहे हे 'कॉफिन लाउंज'? जपानमध्ये 'कुयो' नावाची एक परंपरा आहे, ज्याचा अर्थ 'मेमोरियल सर्व्हिस' असा होतो. याच परंपरेचा आधार घेत कंपन्यांनी आता 'कॉफिन-लाइंग' सर्विस सुरू केली आहे.

ज्यांना आपल्या जीवनातील ताणतणाव आणि भिती कमी करायची आहे, त्यांच्यासाठी हा एक प्रकारचा 'मेडिटेशन'चा (ध्यान) प्रकार मानला जात आहे. मरणाचा अनुभव घेतल्याने जीवनाची किंमत अधिक कळते, असा कंपनीचा दावा आहे.

टोक्योमधील 'मीसो कुकन कनोके-इन' सारख्या स्पा सेंटरमध्ये साध्या लाकडी पेटीऐवजी आता रंगीबेरंगी आणि 'क्यूट' वाटणाऱ्या शवपेटी डिझाइन्स उपलब्ध आहेत, जेणेकरून लोकांना भितीऐवजी शांत वाटेल.

'ग्रेव टोक्यो' नावाची कंपनी विशेष डिझाइन केलेले शवपेटी तयार करत आहे. या पेटीमध्ये लोक स्वतःची पर्सनालिटी आणि आवडीनुसार निवड करू शकतात.

या सेवेसाठी कंपन्यांकडून दर ३० मिनिटांसाठी साधारण १३ डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार १२०० रुपये आकारले जात आहेत. ही सेवा सध्या जपानमध्ये चांगलीच लोकप्रिय होत आहे.

जपानमध्ये वाढत्या आत्महत्येच्या घटना आणि मानसिक तणाव पाहता, अनेक कंपन्या मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी अशा प्रकारचे क्रिएटिव्ह उपाय शोधत आहेत.

ग्राहकांसाठी केवळ साधी शवपेटी नाही, तर त्यांना शांत वाटण्यासाठी मंद संगीत, छतावर प्रोजेक्टरद्वारे व्हिडिओ पाहण्याची सुविधा किंवा पूर्ण शांततेत राहण्याचा पर्यायही दिला जातो.

तुम्हाला या अनुभवासाठी पूर्णपणे शवपेटी बंद करून घ्यायची आहे की अर्धी उघडी ठेवायची आहे? याचे स्वातंत्र्यही ग्राहकांना दिले जाते. स्वतःला ताणमुक्त करण्यासाठी अनेक जण या संधीचा फायदा घेत आहेत.

















