दिवाळीत 'या' बँका देणार स्वस्तात गृहकर्ज; होणार मोठा फायदा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 02:49 PM2023-11-05T14:49:29+5:302023-11-05T14:58:20+5:30

दिवाळीच्या खास मुहूर्तावर देशातील तीन मोठ्या बँकांनी होम लोनवर खास ऑफर आणल्या आहेत.

भारतात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज आणि छठ असे अनेक सण येत्या काही दिवसांत साजरे होणार आहेत. या काळात लोक मोठ्या प्रमाणावर घरे आणि कार खरेदी करतात.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठ्या बँका त्यांच्या ग्राहकांना गृहकर्जावर जोरदार ऑफर आणतात. या वर्षीही काही बँकांनी दिवाळीनिमित्त गृहकर्जावर ऑफर आणली आहे.

यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदासारख्या बँकांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व बँकांनी दिवाळी २०२३ मध्ये गृहकर्जावर सणाच्या ऑफर सुरू केल्या आहेत.

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या निमित्ताने स्टेट बँक ऑफ इंडियाने खास सण ऑफर आणली आहे. ही विशेष ऑफर १ सप्टेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान वैध आहे.

एसबीआय या विशेष मोहिमेद्वारे ग्राहकांना व्याजदरात मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. ग्राहकांना क्रेडिट स्कोअरनुसार ०.६५ टक्के म्हणजेच ६५ बेस पॉइंट्सपर्यंत कमाल सवलतीचा लाभ मिळत आहे.

पंजाब नॅशनल बँक देखील आपल्या ग्राहकांना होम लोनवर जोरदार ऑफर देत आहे. जर तुम्ही या धनत्रयोदशी आणि दिवाळीत बँकेकडून गृहकर्ज घेतले तर बँक ८.४० टक्के दराने गृहकर्ज देत आहे.

यासोबतच प्रक्रिया शुल्क आणि कागदपत्रांवर बँक कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. गृहकर्ज मिळविण्यासाठी, तुम्ही PNB च्या https://digihome.pnb.co.in/pnb/hl/ वेबसाइटला भेट देऊ शकता. याशिवाय, तुम्ही १८०० १८००/१८०० २०२१ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळवू शकता.

बँक ऑफ बडोदाने दिवाळीनिमित्त 'फीलिंग ऑफ फेस्टिव्हल विथ बीओबी' नावाची विशेष मोहीम सुरू केली आहे.

ही मोहीम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वैध आहे. या फेस्टिव्हल ऑफरद्वारे ग्राहकांना सुरुवातीच्या ८.४० टक्के दराने गृहकर्ज दिले जात आहे. यासोबतच बँक ग्राहकांकडून शून्य प्रक्रिया शुल्क आकारत आहे.