आजपासून 'हे' नियम बदलणार, याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 07:36 AM2021-09-01T07:36:41+5:302021-09-01T07:50:45+5:30

अनेक आर्थिक नियम (Financial Rules) आजपासून लागू होतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो.

नवी दिल्ली : 1 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरुवातीला देशात अनेक महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. अनेक आर्थिक नियम (Financial Rules) आजपासून लागू होतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. ईपीएफपासून ते चेक क्लिअरिंगपर्यंतचे नियम आणि बचत खात्यावरील व्याजापासून सिलेंडरचे दर आणि अ‍ॅमेझॉनसारख्या सेवांपर्यंतच्या विविध नियमांमध्ये मोठे फेरबदल दिसून येणार आहेत.

नोकरदार व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे पुढील महिन्यात 1 सप्टेंबरपासून जर तुमचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमचे एम्प्लॉयर तुमच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या (PF) अकाऊंटमध्ये पैसे क्रेडिट करू शकणार नाहीत. ईपीएफओने ईपीएफधारकांना (EPF Account Holders) 1 सप्टेंबरपूर्वी आधारकार्डला यूएन नंबरशी लिंक करावे लागेल.

पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) ग्राहकांना पुढच्या महिन्यात जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण पंजाब नॅशनल बँक 1 सप्टेंबर 2021 पासून बचत खात्यामध्ये जमा होणाऱ्या व्याजामध्ये कपात करण्याची शक्यता आहे. ही माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून देण्यात आली आहे. बँकेने बचत खात्यावरील व्याजदर वार्षिक 3 टक्क्यांवरून घटवून 2.90 टक्के केला आहे. या निर्णयाचा परिणाम नव्या आणि जुन्या अशा दोन्ही ग्राहकांवर होणार आहे.

जर तुम्ही चेकच्या माध्यमातून पैसे पाठवत असाल किंवा चेक पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता 1 सप्टेंबरपासून 50 हजार रुपयांपेक्षा अधिकचा चेक जारी करणे तुमच्यासाठी काहीसे त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टिम (positive pay system) लागू करण्यास सुरुवात केली आहे. अ‍ॅक्सिस बॅक (Axis Bank) या महिन्यापासून पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू करणार आहे.

1 सप्टेंबरपासूनही LPG सिलेंडरच्या किंमती बदलणार आहेत. दरम्यान, महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या (LPG gas cylinder) नवीन किमतींमध्ये बदल होत असतो. दुसरीकडे, धारानौला गॅस सर्व्हिसकडून गॅस वितरणाच्या वेळेत बदल होणार आहे. नगरसह ग्रामीण भागांमध्ये गॅस वाटपाच्या वेळेत बदल केला आहे.

1 सप्टेंबरपासून भारतामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टारचे (Disney plus hotstar) सब्स्क्रिप्शन महाग होणार आहे. युझर्सला या सब्स्क्रिप्शनच्या बेस प्लॅनसाठी 399 रुपयांऐवजी 499 रुपये मोजावे लागणार आहेत. याचाच अर्थ युझर्सला 100 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. तर 899 रुपयांमध्ये ग्राहकांना दोन फोनमध्ये अ‍ॅप सुरू करता येईल. तसेच, या सब्स्क्रिप्शन प्लॅनमध्ये HD क्वालिटी मिळेल. 1,499 रुपयांमध्ये 4 स्क्रीनवर हे अ‍ॅप चालवता येईल.

1 सप्टेंबरपासून अ‍ॅमेझॉनवरून सामान मागवणे महागणार आहे. कंपनी डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने लॉजिस्टिक कॉस्टमध्ये वाढ करू शकते. अशा परिस्थितीत 500 ग्रॅमच्या पॅकेजसाठी 58 रुपये द्यावे लागतील. रीजनल कॉस्ट 36.50 रुपये असेल.

गुगलचे नवे धोरण 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. त्याअंतर्गत चुकीच्या आणि बनावट कंटेंटला प्रमोट करणाऱ्या अॅपवर 1 सप्टेंबरपासून निर्बंध लागू होती. गुगलने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, अॅप डेव्हलपर्सकडून दीर्घकाळापर्यंत वापरण्यात न आलेल्या अॅप्सना ब्लॉक करण्यात येईल. गुगलकडून गुगल प्ले स्टोअर्सच्या नियमांना आधीपेक्षा अधिक कठोर बनवण्यात येत आहे. तसेच गुगल युझर्सला पुढच्या 13 सप्टेंबरला नवा सिक्युरिटी अपडेट मिळेल. त्यामधून गुगल ड्राईव्हचा वापर आधीच्या पेक्षा अधिक सुरक्षित होणार आहे.