भारताशी पंगा घेतल्यास कॅनडाचा बाजार उठणार, वाचा अर्थव्यवस्थेला किती कोटींचा फटका बसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 09:46 AM2023-09-25T09:46:39+5:302023-09-25T10:20:27+5:30

भारत आणि कॅनडामधील वाढत्या राजनैतिक वादानंतर दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांना धक्का बसला आहे.

भारत आणि कॅनडामधील वाढत्या राजनैतिक वादानंतर दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांना धक्का बसला आहे. दोन्ही देशांच्या व्यापाराला मोठं नुकसान सोसावं लागत आहे. कारण कॅनडाची अर्थव्यवस्था भारत आणि भारतीयांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

भारतासोबतच्या कॅनडाच्या आयात-निर्यातीवर तर परिणाम होईलच, पण तिथल्या अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावणाऱ्या आणि कॅनडात स्थायिक झालेल्या भारतीयांच्या नाराजीचाही कॅनडाला सामना करावा लागू शकतो. कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत दरवर्षी ३ लाख कोटी रुपयांचं योगदान देणाऱ्या भारतीयांच्या नाराजीचा तिथल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, कॅनडात स्थायिक झालेले आणि कॅनडात शिकणारे भारतीय दरवर्षी तिथल्या अर्थव्यवस्थेत ३ लाख कोटी रुपयांचे योगदान देतात. दोन्ही देशांमधील संबंध बिघडल्यास कॅनडाला नुकसान सहन करावं लागू शकतं.

कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या २० लाख भारतीयांचा तेथील अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. कॅनडात शिकणारे फक्त साडेतीन लाख भारतीय विद्यार्थी तिथल्या अर्थव्यवस्थेत ४.९ अब्ज डॉलर्सचे योगदान देतात.

कॅनडातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात भारतीयांचे वर्चस्व आहे. शेती असो की आयटी, ट्रॅव्हल असो की बिझनेस असो वा व्यवसाय. प्रॉपर्टी, रिसर्च, छोटे व्यवसाय आणि गुंतवणुकीत भारतीयांनी सर्वाधिक योगदान दिलं आहे. सीआयआयच्या रिपोर्टनुसार, २०२३ पर्यंत मोठ्या भारतीय कंपन्यांनी कॅनडामध्ये ४१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

या कंपन्यांमुळे कॅनडात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होत आहेत. भारतातून मोठ्या संख्येने लोक कॅनडाला जातात. २०२२ मध्ये सुमारे १.१० लाख भारतीयांनी कॅनडाला प्रवास केला. मोठ्या व्यवसायांव्यतिरिक्त, भारतीयांनी कॅनडात ग्रोसरी, हॉटेल्स आणि रेस्तराँ यांसारख्या छोट्या व्यवसायांमध्ये ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

कॅनडामध्ये शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तेथे शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ४० टक्के आहे. कॅनडाला जाणारे भारतीय विद्यार्थी त्यांच्यासोबत कॅनडामध्ये मोठी गुंतवणूक आणतात. भारतानं कठोर निर्णय घेतल्यास कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे.

कॅनडामध्ये शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तेथे शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ४० टक्के आहे. कॅनडाला जाणारे भारतीय विद्यार्थी त्यांच्यासोबत कॅनडामध्ये मोठी गुंतवणूक आणतात. भारतानं कठोर निर्णय घेतल्यास कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे.

खरं तर, कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मोठी भूमिका बजावतात. भरमसाठ फी भरून हे विद्यार्थी तिथे शिकतात आणि तिथली अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत करतात. परदेशी विद्यार्थ्यांकडून कॅनेडियन विद्यार्थ्यांपेक्षा ४ ते ५ पट जास्त शुल्क आकारलं जातं.

कॅनडाच्या कृषी क्षेत्रात भारतीयांचे वर्चस्व आहे. विशेषतः पंजाबी कॅनडात स्थायिक झाले आहेत. कॅनडाच्या एकूण लोकसंख्येपैकी २.६ टक्के म्हणजे ९ लाख ४२ हजार १७० पंजाबी नागरिक आहेत. सेवा क्षेत्रापासून ते व्यवसाय आणि कृषी-दुग्धव्यवसाय क्षेत्रापर्यंत पंजाबी लोकांचा मोठा वाटा आहे. पंजाबी लोकांशिवाय कॅनडा आपल्या अर्थव्यवस्थेचा विचारही करू शकत नाही.

एवढंच नाही तर कॅनडातील मालमत्तेत भारतीयांची सर्वाधिक गुंतवणूक आहे. व्हँकुव्हर, ग्रेटर टोरंटो, ब्रॅम्प्टन, मिसिसॉगा आणि ब्रिटिश कोलंबिया, ओंटारियो येथे भारतीय दरवर्षी ५० हजार कोटींहून अधिक गुंतवणूक करतात. याशिवाय छोटे व्यवसाय, प्रवास, सार्वजनिक सेवा, आयटी आणि संशोधन क्षेत्रात भारतीयांचे वर्चस्व आहे.

भारत आणि कॅनडातील व्यापारी संबंध आतापर्यंत चांगले राहिले आहेत. भारत कॅनडाकडून मोठ्या प्रमाणात डाळीची खरेदी करतो. भारत कॅनडाशिवाय म्यानमार आणि काही आफ्रिकन देशांकडूनही डाळींची खरेदी करतो. जर दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या तणावाचा यावर परिणाम झाला, तर कॅनडाला मोठं नुकसान सोसावं लागू शकतं. भारत आपल्या गरजेनुसार अन्य देशांनुसार आयात करू करू शकतो, पण याचा फटका मात्र कॅनडाला बसणार आहे.