आता रविवारीही अकाउंटमध्ये जमा होणार पगार, बँक सुट्टी असली तरीही नो टेन्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 08:37 PM2021-07-27T20:37:16+5:302021-07-27T20:46:46+5:30

payment : बहुतेक खासगी कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांना महिन्याच्या शेवटच्या तारखेला पगार दिला जातो.

अनेकदा ऐकण्यात येते आज पगार मिळणार होता. मात्र, रविवार असल्यामुळे मिळाला नाही. यासाठी आता आणखी एक दिवस थांबावे लागेल. पण, काही कंपन्या पगाराच्या दिवशी रविवार येत असेल तर एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी कर्मचार्‍यांच्या बँक अकाउंटमध्ये पगार जमा करतात.

दरम्यान, बहुतेक खासगी कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांना महिन्याच्या शेवटच्या तारखेला पगार दिला जातो. पण महिन्याची शेवटची तारीख रविवार असल्यास कर्मचार्‍यांना पगार एक दिवस आधी किंवा एक दिवस नंतर मिळतो. मात्र, आता या रविवारच्या झंझटीपासून सुटका होणार आहे.

आता रविवार असो वा काही कारणास्तव बँक बंद असली तरी कर्मचार्‍यांना पगारासाठी वाट पाहावी लागणार नाही. आता पगार बँक अकाउंटमध्ये जमा करण्याची सुविधा आठवड्यातून सात दिवस उपलब्ध होणार आहे. कंपन्यांना ज्यावेळी वाटेल, त्यावेळी पगार जमा करू शकतात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केले आहे की, बल्क पेमेंट सिस्टम नॅशनल ऑटोमॅटेड क्लियरिंग हाऊस (NACH) आता 1 ऑगस्ट 2021 पासून आठवड्यातील सर्व दिवस उपलब्ध असेल. आता NACH ची सुविधा आठवड्यातील सातही दिवस 24 तास मिळाल्यामुळे पगार करणे सोपे होणार आहे.

आतापर्यंत ही सुविधा फक्त आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांमध्ये उपलब्ध होती, म्हणजे ज्या दिवशी बँका उघडल्या त्या दिवशी ही सुविधा उपलब्ध होती. पगार, पेन्शन, लाभांश पेमेंट, अनुदान यासारख्या महत्त्वपूर्ण ट्रान्सफरसाठी NACH पेमेंट सिस्टमचा विशेष वापर केला जातो.

ही सुविधा मोठ्या प्रमाणात पेमेंट सिस्टममध्ये वापरली जाते. NACH सेवा एनपीसीआय चालविते. वीज, टेलिफोन, पाणी, कर्ज ईएमआय, म्युच्युअल फंड SIP, विमा प्रीमियम देखील NACH द्वारे भरले जाते.

सध्या NACH डीबीटीसाठी लोकप्रिय आणि सुलभ माध्यम म्हणून उदयास आले आहे. NACH सिस्टम दोन पद्धतीने काम करते, एक NACH डेबिट आणि दुसरे NACH क्रेडिट.

कर्मचार्‍यांना पगाराची रक्कम NACH क्रेडिटद्वारे दिली जाते. तर लोक NACH डेबिटद्वारे वीज आणि पाण्याचे बिले भरतात.