शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट? केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 12:05 PM2024-07-09T12:05:10+5:302024-07-09T12:29:44+5:30

budget 2024 : नवीन मोदी सरकार आपला पहिला अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर लवकरच अर्थसंकल्प सादर करण्यासंदर्भात नियोजन आखले जात आहे. अशातच केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरण रिजिजू यांनी गेल्या शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करत २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे.

मोदी सरकार ३.० ची स्थापना होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पीएम किसान योजनेच्या फाइलवर स्वाक्षरी केली. यानंतर, १८ जून २०२४ रोजी पीएम किसानचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट्समध्ये जारी करण्यात आला. आता नवीन मोदी सरकार आपला पहिला अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नवीन सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत. यावेळी लोकांना अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा असून या सर्वसाधारण अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळू शकते, अशी शक्यता आहे. वृत्तानुसार, सरकार पीएम किसान सन्मान निधीची रक्कम वाढवू शकते.

सध्या पीएम किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. प्रामुख्याने ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये, तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये बँक खात्यावर जमा केली जाते. त्यातच आता शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या या आर्थिक मदतीच्या हप्त्याच्या रकमेत वाढ केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीएम किसान सन्मान योजनेच्या सहा हजार रुपयांच्या वार्षिक हप्त्यात वाढ करून, ही रक्कम आठ हजार रुपयांपर्यंत केली जाऊ शकते, असे अनेक मीडिया रिपोर्टमधून समोर येत आहे. याबाबतचा सल्ला कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी अर्थमंत्र्यांना दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आगामी अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. यादरम्यान शेतीसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या जातील. त्यातीलच ही एक महत्वाची घोषणा असणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता योजनेच्या रकमेत वाढ झाल्यास, देशभरातील पात्र शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.