Budget 2024: वंदे भारतमध्ये रेल्वेचे सामान्य डबे बदलणार? प्रवाशांना भाड्यात दिलासा मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 20:09 IST2024-07-17T19:56:49+5:302024-07-17T20:09:40+5:30
Budget 2024: या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासासाठी सरकारकडून भर दिला जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा केल्या जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्र्यांकडून सर्वांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासासाठी सरकारकडून भर दिला जाण्याची शक्यता आहे.
वंदे भारताला चालना मिळण्याची शक्यता
रेल्वेच्या सामान्य बोगींचे वंदे भारतमध्ये रूपांतर करण्यावर सरकार काही काळापासून खूप जोर देत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ४० हजार सामान्य रेल्वे कोच वंदे भारत मानकांमध्ये रूपांतरित करण्याबद्दल भाष्य केले होते. याकडे सरकारचा कल २०२४-२५ च्या अर्थसंकल्पातही दिसून येतो.
यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असा सरकारचा विश्वास आहे. तसेच, अंतर कापण्यासाठी कमी वेळ लागेल. याशिवाय, रेल्वेच्या सामान्य डब्यांमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि रेल्वे अपघातांना आळा घालण्यासाठी सरकार रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यावर भर देऊ शकते. तसेच, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यावरही भर दिला जाणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी अर्थसंकल्पात प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करता येईल. अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती की, सरकारच्या पाइपलाइनमध्ये ११ ट्रिलियन रुपये खर्च करून रेल्वे कॉरिडॉर बांधले जातील.
रिफंड सिस्टमसह या गोष्टी अधिक चांगल्या होतील
२०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे नेटवर्कवरील प्रवासी क्षमता आणि सुरक्षितता वाढवण्यावर अधिक लक्ष दिले जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ तासांत तिकीट परतावा योजना सुरू करणे, रेल्वे सेवांसाठी सर्वसमावेशक सुपर ॲप विकसित करणे आणि तीन कॉरिडॉर स्थापित करणे यावरही काम केले जाईल.
भाडे कमी करण्याची मागणी
कोरोनाच्या कालावधीपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकिटांवर ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळायची, पण २०१९ च्या अखेरीस ही सुविधा बंद करण्यात आली. कोरोना कालावधी संपल्यानंतर भाडे सवलत पुनर्संचयित करण्याची सरकारकडे ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे.
याशिवाय महिला, विद्यार्थी आदींसाठी भाड्यात सवलत देण्याचीही मागणी आहे. कानपूरचे रहिवासी असलेले पंकज सांगतात की, त्यांना कामासाठी अनेकदा दिल्लीला जावे लागते, पण एसी कोचचे भाडे खूप महाग होत आहे, त्यामुळे त्यांचे बजेट विस्कळीत होत आहे. केंद्र सरकारने यावेळच्या अर्थसंकल्पात भाडे कपातीची घोषणा करावी, असे त्यांचे आवाहन आहे.