BSNL युझर्ससाठी आनंदाची बातमी, 'या'वेळी लाँच होणार 4G, 5G सेवा; तुफान वेगानं चालणार इंटरनेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 03:29 PM2022-05-14T15:29:18+5:302022-05-14T15:35:44+5:30

खासगी दूरसंचार कंपन्या यावर्षीच आपली 5G सेवा लाँच करणार आहेत. तर सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलदेखील आपली 5G सेवा लाँच करण्याच्या तयारीत आहे.

देशातील खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्या या वर्षाच्या अखेरिस आपल्या 5G सेवा सुरू करण्याच्या विचारात आहेत. परंतु सध्या त्यांना स्पेक्ट्रम लिलावाची वाट पाहावी लागत आहे.

सरकारनं स्पेक्ट्रम लिलावाची अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही, तसंच यावर काही स्पष्टही केलेलं नाही. परंतु सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार खासगी दूरसंचार कंपन्या या वर्षी 5G सेवा लाँच करतील.

तर सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएल ही 2023 मध्ये 5G सेवा लाँच करणार आहे. या वर्षी कंपनीचं लक्ष्य हे केवळ 4G सेवा लाँच करण्यावर असणार आहे.

BSNL ही कंपनी स्वदेशी 4G नेटवर्क लाँच करणार आहे. ज्यासाठी TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) आणि C-DoT (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स) यांच्या भागीदारीत एक देशांतर्गत 4G कोर आधीच विकसित केला गेला आहे. सध्या देशात 5G सेवांसाठी अद्याप स्पेक्ट्रम उपलब्ध करुन देण्यात आलेले नाहीत.

बीएसएनएल 4G कोअरवर 5G लाँच करू शकते. तर अन्य कंपन्या भारतातील ग्राहकांसाठी 5G नेटवर्क लाँच करण्यासाठी 5G NSA (नॉन-स्टँडअलोन) तंत्रज्ञानाचा फायदा घेतील.

यासाठी बीएसएनएलला सर्वप्रथन 4G नेटवर्कची गरज आहे. अशातच या वर्षाच्या अखेरिस कंपनी देशातील अनेक शहरांमध्ये 4G सेवा लाँच करेल. यामध्ये महाराष्ट्र, केरळ अशा राज्यांचा समावेश आहे.

ऑगस्ट महिन्यात बीएसएनएल केरळच्या चार जिल्ह्यांमध्ये बीएसएनएलची चाचणी सुरू करणार आहे. याशिवाय अन्य राज्यांमध्येही चाचणी सुरू करण्याची शक्यता आहे. परंतु बीएसएनएलनं यासंदर्भात कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे येत्या महिन्यात काही गोष्टी स्पष्ट होतील.