Big Bazaar वाली कंपनी दिवाळखोरीत; खरेदीदारांनी १७ ॲागस्टपर्यंत संधी, पाहा कोण शर्यतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 09:44 AM2023-07-21T09:44:18+5:302023-07-21T09:55:04+5:30

दिवाळखोरीच्या प्रक्रियेसाठी आता १७ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलनं (NCLAT) कर्जात बुडालेल्या कंपनी फ्यूचर रिटेल लिमिटेड (FRL) विरुद्ध दिवाळखोरी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत सुमारे एका महिन्यानं वाढवली आहे. आता या प्रक्रियेसाठी १७ ऑगस्ट २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. कंपनीनं गुरुवारी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, नियामक फाइलिंगमध्ये, कंपनीनं माहिती दिली की एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठानं एफआरएलला कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेमधून (CIRP) ३३ दिवसांच्या कालावधीसाठी बाहेर ठेवण्याची परवानगी दिली आहे. फ्युचर रिटेलच्या मते, एनसीएलटीनं १७ जुलै २०२३ रोजी FRL च्या अर्जावर सुनावणी केली आणि सीआयआरपीसाठी अतिरिक्त सूट देण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, २० जुलै २०२२ रोजी, एनसीएलटीनं कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यामुळे एफआरएल विरुद्ध कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया सुरू केली. यापूर्वी, एनसीएलटीच्या खंडपीठानं सीआयआरपी पूर्ण करण्यासाठी १५ जुलै २०२३ पर्यंत ९० दिवसांची सूट दिली होती.

दिवाळखोरी आणि आयबीसी अंतर्गत सीआयआरपी पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या संदर्भात, कलम १२(१) नुसार कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया सुरू झाल्यापासून १८० दिवसांच्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. याचिका आणि सुनावणीसाठी लागणारा वेळ जोडून ते ३३० दिवसांत पूर्ण करावे लागते. एनसीएलटीनं २० जुलै २०२२ रोजी एफआरएल विरुद्ध कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया सुरू केली होती.

फ्युचर रिटेलच्या शेअरबद्दल सांगायचं झालं तर या कर्जबाजारी कंपनीच्या स्वस्त स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून या स्टॉकमध्ये दररोज अपर सर्किट लागत होतं. जर आपण गेल्या पाच दिवसांबद्दल बोललो तर, दररोजच्या अप्पर सर्किटमुळे या कालावधीत त्याची किंमत १९ टक्क्यांनी वाढली आहे आणि गुरुवारी तो कामकाजाच्या अखेरच्या सत्रात शेअर ३.८० रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

बिग बाझारच्या फ्युचर रिटेलच्या खरेदीसाठी एप्रिल २०२३ मध्ये खरेदीदारांनी स्वारस्य दाखवलं होतं. गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यासह एकूण ४९ कंपन्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये याचा समावेश करण्याच्या शर्यतीत होत्या.

परंतु पुढच्याच महिन्यात म्हणजे मे २०२३ मध्ये, अदानी आणि रिलायन्स समूह दोघेही ही दिवाळखोर कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले. दरम्यान, आता पुन्हा रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स, जिंदाल, पॉलिएस्टर विस्कोस आणि जीबीटीएलसारख्या कंपन्या या शर्यतीत असल्याचं म्हटलं जातंय.

यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार आता अंतिम फेरीसाठी सहा कंपन्यांमध्ये स्पर्धा होणार आहे. बिग बाझारवाली कंपनी फ्युचर रिटेलवर निरनिराळ्या क्रेडिटर्सचे २१००० कोटी रुपयांचे दायित्व आहे.