अमेरिकेनं मोठं टॅरिफ लावताच उघडलं चीन आणि ऑस्ट्रेलियाचं नशीब, हाती लागलं मोठं घबाड; काय आहे प्रकरण?
By जयदीप दाभोळकर | Updated: April 5, 2025 09:09 IST2025-04-05T08:40:53+5:302025-04-05T09:09:09+5:30
Trump Tariff on Australia and China: सोन्याच्या किंमती अशा वेळी वाढत आहेत जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेत येण्यानं जगात अनिश्चिततेचं वातावरण वाढलंय. ट्रम्प यांनी चीनपासून भारतापर्यंत मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं आहे.

Trump Tariff on Australia and China: जगात सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत आणि भारतात शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९१ हजार रुपयांवर पोहोचला. सोन्याच्या किंमती अशा वेळी वाढत आहेत जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेत येण्यानं जगात अनिश्चिततेचं वातावरण वाढलंय. ट्रम्प यांनी चीनपासून भारतापर्यंत मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं आहे. या व्यापार युद्धामुळे जगात मंदीचा धोकाही निर्माण झालाय.
या सर्व परिस्थितीत सोनं एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुढे येतंय. जगभरातील केंद्रीय बँकाही मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहेत. या सोन्यासाठीच्या चढाओढीत चीनमधून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्या ईशान्य प्रांतात १००० टन सोन्याचा प्रचंड साठा शोधल्याचा दावा चीननं केलाय. यापूर्वीही मागील वर्षी चीनने ८० अब्ज डॉलर किमतीच्या सोन्याच्या साठ्याचा शोध लागल्याचं सांगितलं होतं. दुसरीकडे, सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियानेही या संधीचा फायदा घेत सोन्याचं उत्खनन वेगानं सुरू केलंय.
चीनमध्ये सापडलेलं हे सोने खूप विशाल असून जगातील सर्वात मोठ्या साठ्यांपैकी एक असू शकतं, असं संशोधकांचं म्हणणं आहे. एखाद्या देशाकडे मोठ्या प्रमाणात सोने असेल तर तो जगातील आर्थिक संकटाचा सहज सामना करू शकतो.
याचा वापर बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक्स बनवण्यासाठीही केला जाऊ शकतो. चीन हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा उत्पादक देश असून २०२४ मध्ये ३८० टन सोन्याचं उत्पादन झालं. मात्र, एकूण सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत चीन अजूनही दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियापेक्षा पिछाडीवर आहे.
चीनच्या लियाओनिंग प्रांतात सापडलेला हा सोन्याचा साठा चीनला सोन्याच्या उत्पादनात आघाडी राखण्यास मदत करू शकतो. मात्र, याच्या अचूकतेबाबत अनेक तज्ज्ञ शंका घेत आहेत. ते सोन्याचा दर्जा आणि त्याच्या संभाव्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्याचबरोबर या खाणींचे उत्खनन सोपं असल्याचा चीनचा दावा आहे. येथे मोठ्या प्रमाणात सोन्याचं उत्खनन होऊ शकते. यापूर्वी नोव्हेंबर महिन्या आपल्याला ८० अब्ज डॉलरचा सोन्याचा साठा सापडला असल्याचा दावा चीननं केला होता. हे सोनं वुनान प्रांतातील वांगू गोल्डफिल्डमध्ये सापडलं होतं.
वांगू येथे १ मैल खोलीवरील हे सोनं सापडलं आहे. हे सोनं आपल्या संसाधन सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असल्याचं चीनचं म्हणणं आहे. दरम्यान, भूगर्भशास्त्रज्ञांनी चीनच्या या दाव्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केलीये. त्याचबरोबर सोन्याचा अधिक खोलात शोध लावावा अशी त्यांची इच्छा आहे. हे सोनं काढण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, जगात सोन्याची झपाट्यानं होणारी मागणी लक्षात घेता ऑस्ट्रेलियानं आपल्या सोन्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे. जगातील सोन्याचा साठा आता ९ टक्क्यांनी वाढून २,१६,२६५ टनांवर पोहोचलाय. २०३० पर्यंत ऑस्ट्रेलिया सोने उत्पादनात चीन आणि रशियासारख्या देशांना मागे टाकेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. २०३० पर्यंत ऑस्ट्रेलिया दरवर्षी ३७७ टन सोन्याचं उत्पादन करेल, जे २०२३-२४ मध्ये २८९ टन होतं.