जेफ बेझोस यांच्या एक्स पत्नीने पोटगीत मिळालेली एवढी रक्कम केली दान, घटस्फोटावेळी दिलेला शब्द केला खरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 11:09 IST2025-02-21T11:06:22+5:302025-02-21T11:09:46+5:30
MacKenzie Scott : अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची पूर्वाश्रमीची पत्नी मॅकेन्झी स्कॉट आपल्या दातृत्वासाठी जगभर चर्चेत आली आहे. त्यांनी घटस्फोटावेळी दिलेला शब्द ती पूर्ण करत आहे.

'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावेत' या विंदा करंदीकर यांच्या कवितेतील ओळींचा अनेकदा अनुभव येतो. एकीकडे पैशाच्या पाठीमागे धावणारी लोकं दिसतात, तर दुसरीकडे आपली संपत्ती दान करणाऱ्या लोकांचीही कमी नाही.

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची पूर्वाश्रमीची पत्नी मॅकेन्झी स्कॉट यांनी आपल्या शब्दावर ठाम राहत अब्जावधी रुपयांची संपत्ती विविध सामाजिक संस्थांना दान केली आहे.

सेंटर फॉर इफेक्टिव्ह फिलान्थ्रॉपीच्या नवीन अभ्यासानुसार, तिने गेल्या ६ वर्षांत २,००० हून अधिक सामाजिक संस्थांना आर्थिक मदत दिली आहे.

२०१९ मध्ये जेफ बेझोससोबत घटस्फोट घेतल्यानंतर मॅकेन्झीला घटस्फोटाच्या करारानुसार अॅमेझॉनमध्ये ४ टक्के स्टेक मिळाला होता, ज्याची किंमत त्यावेळी सुमारे ३६ अब्ज डॉलर्स होती.

२५ वर्षांचा संसार केल्यानंतर स्कॉट आणि बेझोस यांनी २०१९ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटाची जगभर चर्चा झाली. सोशल मीडियावर घटस्फोटाच्या अटी जाहीर केल्यानंतर तिने गिव्हिंग प्लेजवर स्वाक्षरी केली. यामध्ये तिने तिच्या आयुष्यभरात किमान अर्धी संपत्ती दान करण्याचे वचन दिले.

फोर्ब्सच्या मते, सध्या त्यांची एकूण संपत्ती ३२ अब्ज अमेरिकन डॉलर्स अर्थात २७7०२७ कोटी रुपये आहे. मॅकेन्झी पूर्व टेक्सासपासून उत्तर टांझानियापर्यंत २,४५० हून अधिक संस्थांना आर्थिक मदत करते. जे आरोग्य, शिक्षण, परवडणारी घरे, इमिग्रेशन अशा अनेक मुद्द्यांवर काम करतात.

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी मॅकेन्झी यांच्या दातृत्वावर प्रतिक्रिया दिली होती. मॅकेन्झी करत असलेल्या दानाला त्यांनी 'चिंताजनक' म्हटले. अनेक महत्त्वाच्या जागतिक समस्यांपेक्षा वांशिक समानता, स्थलांतरितांचे हक्क आणि LGBTQ यांसारख्या मुद्द्यांवर स्कॉटचे लक्ष अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

















