प्रभू राम एकटेच नाही तर 'लक्ष्मी'देखील येणार; अयोध्येचं अर्थकारण 'असं' बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 07:12 PM2024-01-15T19:12:32+5:302024-01-15T19:15:56+5:30

संपूर्ण देशाचे लक्ष सध्या येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या लोकार्पणाकडे लागले आहे. या सोहळ्याची जवळपास सर्वच तयारी पूर्ण होत आली आहे. अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने भक्तांमध्ये आनंद आणि उत्साह आहे

एकीकडे धर्माच्या दृष्टीकोनातून पाहिले तर आस्था, भक्तीचा सागर इथं पाहायला मिळेल परंतु अर्थव्यवस्थेच्या चष्म्यातून पाहायला गेले तर प्रभू रामाच्या आगमनानंतर अयोध्येतील विकासाचे चित्र बदलणार आहे. अयोध्येतील राम मंदिरामुळे या शहराला नवी धार्मिक ओळख मिळणार आहे. त्याचसोबत व्यवसायाला मोठी चालनादेखील मिळेल

भारतासारख्या देशात सरासरी एक भारतीय एका दिवसात २ हजार ७१७ रुपये धार्मिक विधींवर खर्च करतो. अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भारतीय अर्थव्यवस्था आणि जीडीपी यांच्यावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. राम मंदिरापासून अयोध्या आणि आसपासच्या जिल्ह्यांचा विकासाला बूस्टर डोस मिळेल.

पर्यटन आणि इतर क्षेत्रासाठी ही मोठी संधी आहे. हॉटेल इंडस्ट्री, छोटे-मोठे व्यावसायिक, लोकल उद्योगाला चालना मिळेल. अयोध्या हे मुख्य केंद्र असेल त्यामुळे मोठमोठ्या कंपन्याही इथं गुंतवणूक करण्याची संधी सोडणार नाहीत. सध्या हॉटेल इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे.

अयोध्या आज देश आणि जगात चर्चेत आहे. देशाची धार्मिक राजधानी म्हणून अयोध्येकडे पाहिले जात आहे. त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेतही अयोध्येचे योगदान वाढेल. पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. हॉटेल, रिसोर्टसह अनेक क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.

एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, गेल्या काही दिवसांत अयोध्येत गुंतवणुकीसाठी १०२ करार झाले आहेत. जागतिक गुंतवणूक समिटमध्ये अयोध्येतील पर्यटन क्षेत्रासाठी १८ हजार कोटी रुपयांचे १०२ करार झालेत. त्यानंतरही अजून काही कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढाकार घेत आहेत.

अयोध्येत सध्या १२६ प्रकल्प सुरू आहेत. ४६ प्रकल्प विचाराधीन आहेत. तर ८० प्रकल्पावर स्वाक्षरी बाकी आहे. या १२६ प्रकल्पांचा खर्च ४ हजार कोटीहून अधिक आहे. पर्यटकांची संख्या पाहता अयोध्येत ५० नवीन हॉटेल आणि रिसोर्ट तयार होत आहेत. ताज, मॅरियेट, जिंजर, ओबेरॉय, ट्रायडेंट, रेडिसनसारख्या बड्या कंपन्या अयोध्येत गुंतवणूक करत आहेत.

अयोध्येत हॉटेल इंडस्ट्रीतील ४ मोठ्या प्रकल्पावर ४२० कोटी गुंतवणूक झाली आहे. पंचे ड्रीमवर्ल्ड एवएलपी १४० कोटी गुंतवणूक झाली आहे. इतकेच नाही तर अयोध्येत बाटलीबंद पाणी बनवणाऱ्या बिसलेरी कंपनीनेही ग्रीनफिल्ड प्लांटची घोषणा केली आहे. अयोध्येच्या विकासासाठी जवळपास ८५ हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. पुढील १० वर्षाचा आराखडा त्यासाठी आखण्यात आला आहे.

राम मंदिर बनल्यानंतर अयोध्येतील रिअल इस्टेटला मोठा बूस्ट मिळाला आहे. अयोध्येतील जागेच्या किंमती ४ पटीने वाढल्या आहेत. एविएशन सेक्टरने अयोध्येला ताकद दिली. इंडिगो, स्पाईसजेटसारख्या विमान सेवांनी इथं फ्लाईट सुरू केल्यात. नवनवीन राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग बनलेत. राम मंदिर उद्घाटनानंतर याठिकाणी दरवर्षी २०-२५ कोटी भाविक येतील अशी अपेक्षा आहे.

अयोध्येत प्रभू राम एकटेच नाही तर त्यांच्यासोबत स्थानिकांच्या आयुष्यात लक्ष्मीही विराजमान होणार आहे. अयोध्येतील अर्थव्यवस्थेमुळे देशातील अर्थव्यवस्थेलाही ताकद मिळेल. व्यापारी संघटना कॅटनुसार, जानेवारीत राम मंदिराच्या भव्य सोहळ्याच्या आयोजनामुळे देशात ५० हजार कोटींची व्यावसायिक उलाढाल झाली आहे.