'वेळे'ची गोष्ट, एकेकाळी अभिमानानं लोक वापरायचे hmt चं घड्याळ; मग असं काय झालं की…

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 10:18 AM2023-04-13T10:18:55+5:302023-04-13T10:44:43+5:30

Journey of HMT Watch: १९६१ मध्ये सुरू झालेला एचएमटीचा प्रवास ९० च्या सुरुवातीपर्यंत अगदी टॉपवर होता. परंतु ९० च्या दशकात एचएमटीच्या घड्याळाला मार्केटमध्ये एन्ट्री घेणाऱ्या टाटा समूहाच्या (Tata Group Titan) टायटननं टक्कर देण्यास सुरूवात केली.

एक काळ असा होता की लोकांच्या मनगटावरील घड्याळ हे स्टेटस सिम्बॉल मानलं जायचं आणि ते घड्याळ जर एचएमटीचं (hmt Watch) असेल तर कायच म्हणाल… मग काळ बदलला आणि डिजिटलायझेशनमुळे चावीच्या घड्याळांची जागा स्मार्ट घड्याळांनी घेतली. ९० चं दशक असं होतं की घड्याळ म्हणजे एचएमटी असं समीकरण झालं होतं. लोकांनी अभिमानानं ते वापरलं. आता प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या बाजारपेठेची मागणी आणि मोठा व्यवसाय असूनही उतरती कळा कशी लागली आणि उत्पादन थांबवावे लागले? एचएमटी घड्याळांचं उत्पादन सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंतच्या प्रवासावर एक नजर टाकूया, जो खूपच मनोरंजक आहे.

भलेही आज एचएमटी हे नाव दिसेनासं झालं असेल. पण ९० च्या दशकात त्यांचा रुबाबच वेगळा होता. लग्नात वराला भेटवस्तू द्यायची असेल किंवा मूल चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालं असेल तर भेटवस्तूंमध्ये पहिली पसंती एचएमटीच्या घड्याळांना होती. या भारतीय ब्रँडचा इतिहास आश्चर्यकारक आहे. आज जरी स्मार्टवॉचचा काळ आला असला तरी अनेक लोकांकडे आजही एचएमटीची ठेवलेली घड्याळं सापडतात. जवळपास पाच दशकं कंपनीनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं.

एचएमटीचं घड्याळ माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात सुरू झालं होतं. एचएमटीच्या (हिंदुस्थान मशीन टूल्स) स्थापनेनंतर १९६१ मध्ये भारतात hmt घड्याळाचं उत्पादन सुरू झाले. कंपनीनं जपानच्या सिटीझन वॉच कंपनीच्या सहकार्यानं एचएमटीचं उत्पादन सुरू केलं.

कंपनीनं तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसाठी पहिलं घड्याळ बनवलं आणि त्यानंतर कंपनीचा चढता आलेख सुरू झाला. ७० आणि ८० च्या दशकात एचएमटी घड्याळांचा व्यवसाय एका उंचीवर पोहोचला होता. ९० च्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत त्याची भरभराट होत राहिली. त्याची क्रेझ एवढी होती की प्रत्येक वर्ग अभिमानानं हे घड्याळ वापरत होता.

एचएमटीचं पहिले घड्याळ जनता ब्रँडच्या नावाखाली होते आणि हे मॉडेल इतकं प्रसिद्ध झालं की त्याने दोन दशकं बाजारावर राज्य केलं. मात्र, त्यानंतर कंपनीनं मॉडेल्समध्ये अनेक बदल केले आणि जवाहरसह अनेक नावांनी रिस्ट वॉच बाजारात आणली. कंपनीच्या गांधी घड्याळाची ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठी क्रेझ होती. एचएमटीच्या व्यवसायाबद्दल सांगायचं तर, देशातील रिस्ट वॉच विकणाऱ्या या पहिल्या कंपनीनं सुरुवातीच्या १५ वर्षांच्या व्यवसायात ११ कोटींहून अधिक घड्याळांची विक्री केली होती.

एचएमटी घड्याळं सर्व वर्गातील लोकांसाठी उपलब्ध होती. एचएमटी ब्रँडची मॉडेल्स शोरूममध्ये ३०० ते ८००० रुपयांपर्यंत उपलब्ध होती. यामध्ये मनगटावरील घड्याळं ते खिशातील घड्याळांचा समावेश होता. १९७० च्या दशकात, एचएमटीने सोना आणि विजय या ब्रँड नावानं क्वार्ट्ज घड्याळं तयार करण्यास सुरुवात केली.

एचएमटीची पहिली फॅक्ट्री बंगळुरूमध्ये मध्ये ११२ एकर परिसरात स्थापन करण्यात आली होती. हिंदुस्तान मशीन टूल्स लिमिटेड आणि जपानी सिटीझन वॉच कंपनीदरम्यान झालेल्या करारानंर याची सुरूवात झाली. या कंपनीत वर्षाला ३.६ लाख एचएमटी घड्याळं तयार करता येऊ शकत होती. यानंतर उत्तराखंडमधील रानीबाग येथे एक मोठी एचएमटी फॅक्ट्री स्थापन करण्यात आली. जेव्हा बाजारात या कंपनीचं वर्चस्व होतं त्यावेळी कंपनीकडे ३५०० मॉडेल्स होती.

एचएमटी घड्याळासाठी दिलेली टॅगलाइनही बरीच प्रसिद्ध होती. त्याला ‘देश की धडकन’ असं म्हटलं जायचं. १९६१ पासून सुरू झालेला एचएमटीचा गौरवशाली प्रवास ९० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत सुरू होता. त्यानंतर ९० च्या दशकात टाटा समूहाच्या टायटन (Titan) घड्याळाच्या बाजारपेठेत एचएमटीला एंट्री करून स्पर्धा देण्यास सुरुवात केली. केवळ टायटनच नाही तर अनेक खासगी कंपन्यांनी त्यांच्या नवीन तंत्रज्ञान आणि डिझाइनसह या क्षेत्रात प्रवेश केला. तेव्हापासून एचएमटी घड्याळ्यांना जुन्या पद्धतीचं तंत्रज्ञान असलेली घड्याळं म्हटली जाऊ लागली.

देशात उदारीकरणानंतर या कंपनीला उतरती कळा लागली. त्यांची विक्री कमी होऊन तोटा वाढू लागला. हा तो काळ होता जेव्हा भारतीय बाजारपेठा जगासमोर उघडल्यानंतर घड्याळांसह प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली आणि एचएमटीशी स्पर्धा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि डिझाइन्सने सुसज्ज घड्याळं बाजारात पोहोचू लागली. पण त्यांच्या म्हणण्यानुसार एचएमटी स्वतःला अपग्रेड करू शकली नाही.

लोक नवीन तंत्रज्ञान आणि डिझाइन्सकडे आकर्षित होऊ लागले आणि एचएमटी याचा बळी ठरला. कंपनीच्या वाढत्या तोट्यामुळे देशातील सर्वच प्रकल्पांमध्ये उत्पादन घटलं. तेव्हापासून एचएमटी घड्याळांची क्रेझ कमी होत गेली.

एचएमटी घड्याळांसाठी लोकांना आर्मी कॅन्टीनमध्ये बराच वेळ थांबावं लागत होतं. एचएमटीला देशभरातून वर्षाला सुमारे सहा लाख घड्याळांची ऑर्डर मिळायची. लष्कराच्या कॅन्टीनला घड्याळं पुरवण्यासाठी जवळपास एक महिना लागायचा. आर्मी कॅन्टीनमध्ये एचएमटी घड्याळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहिली जात होती.