Coronavirus Jobs : कोरोनाचा फटका; निर्बंधांमुळे एप्रिल महिन्यात तब्बल ७५ लाख कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 01:50 PM2021-05-04T13:50:30+5:302021-05-04T13:55:27+5:30

Covid-19: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लावण्यात आले होते निर्बंध.

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक स्तरावर लावण्यात आलेल्या निर्बंधांचा कर्मचारी वर्गाला मोठा फटका बसला आहे.

कोरोना महासाथीची दुसरी लाट आणि त्यावर मात करण्यासाठी स्थानिक स्तरावर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि अन्य निर्बंधांमुळे ७५ लाखांपेक्षा अधिक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.

यामुळे देशातील बेरोजगारी दर चार महिन्याच्या सर्वोच्च म्हणजेच ८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIEE) नं सोमवारी याबाबतची माहिती दिली.

भविष्यात रोजगारच्या बाबतीत ही परिस्थिती आव्हानात्मक राहील. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये आम्ही ७५ लाख रोजगार गमावला, अशी माहिती सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश व्यास यांनी दिली.

यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय बेरोजगारीचा दर ७.९७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण ९.७८ टक्के आहे. तर ग्रामीण भागात ते ७.१३ टक्के असल्याचं त्यांनी सांगितलं.

यापूर्वी मार्चमध्ये राष्ट्रीय बेरोजगारीचा दर ६.५० टक्के होता आणि ग्रामीण तसंच शहरी भागातही हा दर तुलनेने कमी होता.

कोरोना महासाथीच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनसह अन्य निर्बंधही घातले आहेत.

याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकऱ्याही गमवाव्या लागल्या आहेत.

"कोरोनाची महासाथ पीकवर केव्हा जाईल याची माहिती नाही. परंतु रोजगाराच्या बाबतीत मोठी समस्या दिसून येऊ शकते." असं व्यास म्हणाले.

सध्या स्थिती तेवढीही बिकट नाही, जितकी पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी होती. त्यावेळी बेरोजगारीचा दर २४ टक्क्यांवर पोहोचला होता, असंही त्यांनी नमूद केलं.