MTNL ला ७ लाख ५८ हजार मुंबईकरांचा रामराम; नव्या जोडणीत मोठी घट, दर्जा राखण्यात अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 10:45 AM2021-12-19T10:45:25+5:302021-12-19T10:52:19+5:30

MTNL आणि BSNL च्या मालमत्तांची विक्री करून ९७० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मोदी सरकारचा मानस आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क: MTNL आणि BSNL या सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आर्थिक रसद पुरवूनही त्यांच्या स्थितीत सुधारणा होताना दिसत नाही. एकेकाळी मुंबई आणि दिल्ली या महानगरांवर हुकूमत गाजवणाऱ्या एमटीएनएलच्या ग्राहकसंख्येचा आलेख तर दिवसागणिक खालावत आहे.

गेल्या नऊ वर्षांत तब्बल ७ लाख ५८ हजार ग्राहकांनी एमटीएनएलच्या लँडलाईन सेवेस रामराम ठोकल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमटीएनएलच्या मागील दहा वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितला होता.

या अर्जाला प्रत्युत्तर देताना MTNL मुंबईच्या उपमहाव्यवस्थापकांनी सदर माहिती सादर केली आहे. सन २०१३-१४ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार ७ लाख ५८ हजार ९२९ लँडलाईन ग्राहकांनी MTNL ला सोडचिठ्ठी दिली.

या काळात केवळ ३ लाख २५ हजार ३२० नवे ग्राहक जोडले गेले. त्यामुळे सध्या या कंपनीकडे केवळ १४ लाख ७५ हजार ५४७ इतके लँडलाईन ग्राहक उरले आहेत. गेल्या ९ वर्षांत सव्वातीन लाख नवे ग्राहक जोडले गेले असले, तरी गेल्या दोन वर्षांतील नवी ग्राहकसंख्या एमटीएनएलच्या चिंतेत भर टाकणारी आहे.

MTNL सेवेबाबत आधीच ग्राहकांमध्ये नाराजी होती. त्यात गेल्या काही वर्षांत कंत्राटीकरणामुळे सेवेचा दर्जा राखण्यात एमटीएनएल सपशेल अपयशी ठरली आहे. कुशल कर्मचाऱ्यांची भरती आणि सेवेची गुणवत्ता राखली तरच स्पर्धेत तग धरता येईल.

पंतप्रधान आणि दूरसंचारमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून या सरकारी कंपनीला वाचविण्यासाठी उपाययोजना आखल्या पाहिजेत, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.

देशात मोबाईलच्या आगमनानंतर MTNL ने महानगरांत आपले जाळे विस्तारत असंख्य ग्राहक जोडले. त्याकाळी लांबलचक रांगा लावून एमटीएनएलचे सीमकार्ड खरेदी केल्याचे किस्से आजही सांगितले जातात.

खासगी कंपन्यांनी दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर प्रचंड स्पर्धा निर्माण झाली; पण पायाभूत सुविधांचे सर्वाधिक स्रोत, सरकारी पाठबळ आणि कुशल मनुष्यबळ पदरी असतानाही एमटीएनएलला या स्पर्धेत टिकाव धरता आला नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत त्यांचा ग्राहकसंख्येचा आलेख घसरणीला लागला आहे.

दरम्यान, सरकारी कंपन्या असलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या स्थावर मालमत्तांची विक्री करून ९७० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा सरकारचा मानस आहे. मुंबईसह हैदराबाद, चंदीगड, भावनगर आणि कोलकाता शहरांमधील मालमत्तांची विक्री केली जाणार आहे.

सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीत ही विक्री प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामध्ये बीएसएनएलच्या ६६० कोटींच्या, तर एमटीएनएलच्या ३१० कोटी रुपयांच्या मालमत्तांचा समावेश आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरातील वसारी हिल भागामध्ये असलेली मालमत्ता तसेच ओशिवरा परिसरातील एमटीएनएलचे १२ फ्लॅट विकण्यात येणार आहेत.

यामधून एकूण ३१० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. या फ्लॅटचे मूल्य ५२.६० लाख रुपयांपासून १.५९ कोटी रुपयांपर्यंत आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या संपत्तीचे रोखीकरण करण्याचा हा पहिला टप्पा आहे.