१ ऑगस्टपासून होणार ६ मोठे बदल; घरचं आर्थिक बजेट सांभाळण्यासाठी आजच वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:51 PM2023-07-31T12:51:48+5:302023-07-31T12:55:45+5:30

जुलै महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपासून आर्थिक बाबींशी निगडीत अनेक नियमांत बदल होणार आहे. या नियमांमध्ये आयटीआर रिटर्नपासून जीएसटी, क्रेडिट कार्ड पेमेंटबाबतचे नियमांचा सहभाग आहे.

ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या या बदलांमुळे सर्वसामान्याच्या आर्थिक बजेटवर परिणाम होणार आहे. १ ऑगस्टपासून जीएसटीनिगडीत प्रणालीमध्ये बदल होणार आहे. त्याचसोबत पीएनजी, कमर्शियल गॅसच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. नेमके हे बदल काय जाणून घेऊया

सरकारी घोषणेनुसार, १ ऑगस्ट २०२३ पासून ५ कोटी रुपयांहून अधिक टर्नओव्हर असलेल्या व्यापारांना इलेक्ट्रिक इनवॉईस देणे गरजेचे असेल. अशावेळी जीएसटीच्या कक्षेत येणाऱ्या व्यापाऱ्यांनी संबंधित नियमांबाबत विस्तारात जाणून घेऊन इलेक्ट्रॉनिक इनवॉईस बनवण्याची तयारी करा.

आयकर रिटर्न भरण्यासाठी ३१ जुलै शेवटची तारीख आहे. त्यानंतर १ ऑगस्टपासून आयटीआर भरणाऱ्यांना दंड आकारला जाईल. ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांनी रात्री १२ च्या आयटीआर दाखल करा. अन्यथा उद्यापासून १ ते ५ हजार दंड भरावा लागेल.

ऑगस्टमध्ये रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन आणि विविध सणांमुळे १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये शनिवार, रविवार मिळणाऱ्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. या १४ सुट्ट्यांच्या काळात बँकांच्या ऑनलाईन सेवा सुरू राहतील.

ऑगस्टमध्ये एलपीजीसोबत व्यावसायिक सिलेंडर किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला घरगुती गॅसच्या किंमतीत बदल करतात. त्याशिवाय पीएनजी, सीएनजी दरही बदलले जातात.

प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या दिवशी मध्यरात्री तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची घोषणा करतात. अशावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत १ ऑगस्टपासून बदल पाहायला मिळू शकतो. मागील वर्षी २१ मे पासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर असल्याचे दिसून येते.

जर तुमच्याकडे एक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर तुमच्या खिशावर सकारात्मक भार पडू शकतो. एक्सिस बँक आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करणाऱ्या लोकांसाठी नव्या नियमानुसार १२ ऑगस्टपासून कुठल्याही खरेदीवर कॅशबॅक मिळणार आहे.

देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आणि आयडीएफसी बँकेत अमृत कलश योजनेत गुंतवणूक कऱण्यासाठी १५ ऑगस्ट २०२३ ही अंतिम तारीख दिली आहे. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर वेळेआधीच पैसे गुंतवा.