Post Office च्या ५ जबरदस्त योजना; पैसे वाढतच जातील, बंपर परतावा मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 10:23 AM2023-08-01T10:23:08+5:302023-08-01T10:31:46+5:30

बहुतेक लोक गुंतवणुकीसाठी असे पर्याय शोधतात ज्यात त्यांचे पैसे सुरक्षित असतील आणि परतावाही मिळेल

Post Office Saving Scheme: बहुतेक लोक गुंतवणुकीसाठी असे पर्याय शोधतात ज्यात त्यांचे पैसे सुरक्षित असतील आणि परतावाही मिळेल. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी तो सुरक्षित पर्यायाला प्राधान्य देतात. जेव्हा सुरक्षित गुंतवणुकीचा विचार केला जातो तेव्हा बहुतेक गुंतवणूकदारांच्या मनात पहिला पर्याय येतो तो म्हणजे पोस्ट ऑफिसचाच.

पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना भारत सरकारद्वारे चालवल्या जातात आणि त्याचं व्याज देखील सरकार ठरवते. यामुळेच लोक पोस्ट ऑफिस योजनांमध्ये पैसे गुंतवणे सर्वात सुरक्षित मानतात. या पोस्ट ऑफिस योजनांमध्ये, तुम्हाला १.५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ८० सी अंतर्गत सूट मिळू शकते.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) - तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीममध्ये किमान १ हजार रूपये आणि त्यानंतर १०० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. यात कोणतीही कमाल मर्यादा नाही. या योजनेची मॅच्युरिटी ५ वर्षे आहे. यावर ७.१ टक्के दराने व्याज मिळते. यावर ८० सी अंतर्गत सूटही मिळते.

सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS) - तुमचे वय ६० किंवा त्याहून अधिक असल्यास, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सीनिअर सिटिझन सेव्हिंग अकाऊंट उघडू शकता. यावर वार्षिक ८.२ टक्के व्याज मिळते. याचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा असतो. यामध्ये तुम्ही कमाल १५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता.

सुकन्या समृद्धी योजना (SSY) - १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर खातं उघडून तुम्ही सुकन्या समृद्धी योजना योजनेचा लाभ घेऊ शकता. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ती या खात्याची मालक बनते. सुकन्या समृद्धी खात्यावर सध्याचा व्याजदर ८ टक्के आहे. एका आर्थिक वर्षात या खात्यात किमान २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. सुकन्या समृद्धी योजना आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर सवलतीच्या श्रेणीत येते.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट - तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्येही गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही कमाल १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. ५ वर्षांच्या ठेवीवर ८० सी अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे. तुम्हाला ५ वर्षांच्या ठेवीवर ७.५० टक्के व्याज मिळेल.

पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF) - सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खातं ही दीर्घकालीन स्कीम आहे. पीपीएफमध्ये मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षे आहे. हे ८०सी अंतर्गत सूट आहे. यामध्ये तुम्ही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. पीपीएफवर वार्षिक ७.१ टक्के व्याज मिळते.